‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजस्विनी लोणारी या घरातून बाहेर पडली. तिची एक्झिट ही सर्वांसाठीच अनपेक्षित होती. ती घरातून बाहेर पडल्यानंतर तिला झालेल्या दुखापतीबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. आता तिने भाष्य करत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
तेजस्विनीला टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनीला पुढील खेळ खेळणे सोयीचे नसल्याने तिला बिग बॉसच्या घरातून तिला निरोप घ्यावा लागला.
आणखी वाचा : ‘बिग बॉस’मधून राखी सावंतचा पत्ता होणार कट? घरातली भांडी फोडल्याने अभिनेत्रीबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय
त्यानंतर तिच्या हाताचं ऑपरेशन करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अखेर तेजस्विनीने एक पोस्ट शेअर करत याबद्दल खरी माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो तुम्ही खूप मजेत असाल अशी मी अपेक्षा करते. माझ्या तब्येतीची विचारपूस करणारे अनेक संदेश मला तुमच्याकडून मिळाले. माझ्या बोटाची शस्त्रक्रिया झाल्याचा गैरसमज अनेकांना होत असल्याचे मला समजले. मुळात, तसं काहीही झालं नाही.”
पुढे ती म्हणाली, “माझ्या हाताला किरकोळ फ्रेंक्चर झाले असून, ते काही आठवड्यात भरून निघेल. त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज नाही असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले. आता तीन आठवडे झाले असून बऱ्यापैकी सुधारणादेखील होत आहे. लवकरच एकदम तेजस्वी तेजस्विनी तुम्हाला परत एकदा दिसून येईल. तुमचं माझ्यावरच प्रेम असंच राहू द्या.”
हेही वाचा : “माझी इच्छा नसतानाही मला…” तेजस्विनी लोणारीचं ‘बिग बॉस’बद्दल मोठं विधान
तेजस्विनी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडण्याच्या या निर्णयाने सर्वांनाच दुःख झालं होतं. तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्यही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.