Satish Kaushik Passed Away: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (९ मार्च) निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतिश यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह कलाकार मंडळी दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनीही सोशल मीडियाद्वारे भावूक पोस्ट शेअर केली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवे याने सतीश कौशिक यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

राजकुमार आर्यन या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण करणाऱ्या अनिरुद्धने सतीश कौशिक यांच्याबरोबर काम केलं आहे. इटाईम्सशी बोलताना तो असं म्हणाला, “मी जेव्हा सकाळी ही बातमी बघितली तेव्हा मला धक्का बसला. माझ्या दिवसाच्या सुरवातीलाच अशी बातमी समजली. त्यांचं जाण माझ्या वैयक्तिक आयुष्यसाठी हे खूप मोठं नुकसान आहे. मला समजत नाही ही गोष्ट मी कशी पचवू ते, माझ्या पसंतीच्या व्यक्तींमधील ते एक होते.”

सतीश कौशिक यांच्या ‘पप्पू पेजर’ या अजरामर पात्राचं कनेक्शन आहे ऋषी कपूर यांच्या सुपरहिट चित्रपटाशी; अभिनेत्यानेच केलेला खुलासा

तो पुढे म्हणाला, “होळीच्या एक दिवस आधी 6 मार्चला मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी माझी ती शेवटची भेट असेल याची मला कल्पनाही नव्हती. त्यांनी हसत हसत माझे स्वागत केलं होतं. संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी ते एक उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, निर्मातें होते मात्र माझ्यासाठी ते एक उत्तम व्यक्ती होते. सतीश सर खूप नम्र होते. माझ्या आयुष्यात माझ्याकडे असे बरेच लोक आहेत ज्यांनी माझ्या अभिनय कारकिर्दीत मला साथ दिली आणि त्यांनी माझ्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.”

करोना काळात अनिरुद्ध रुग्णालयात ICU मध्ये होता, त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “२०२१ मध्ये मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात होतो आणि सतीश सर नियमितपणे माझ्या तब्येतीची चौकशी करत होते. आमच्या ‘छोरियां छोरों से कम नहीं होती’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी मला माहिती दिली. त्यांनी मला एक सुंदर मेसेज सुद्धा पाठवला होता लवकर बरा हो आपल्याला चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला एकत्र जायचं आहे. त्याचे शब्द मला खूप आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देत होते.” अशी शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

नुकतेच या दोघांनी ‘कागज २’ चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. यामध्ये ते पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. सतीश कौशिक यांच्या जाण्याने अनेक कलाकारांना धक्का बसला आहे.