रिअ‍ॅलिटी शो खरंच रिअल असतात की स्क्रिप्टेड असतात यावरुन नेहमीच चर्चा रंगलेली असते. सेलिब्रिटी, निर्माते, दिग्दर्शक नेहमीच हा दावा फेटाळत असतात. त्याशिवाय रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेकांकडून याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसतात. काही जण म्हणतात की हो रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात, तर काही जण हे असं काही नसतं असं म्हणतात. अशातच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकाने रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असल्याचा खुलासा केला आहे.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईसने (Terence Lewis) याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. अनेक रिअ‍ॅलिटी शोचे परीक्षण करणाऱ्या टेरेन्सने रिअ‍ॅलिटी शोमधील काही खास क्षण स्क्रिप्टेड असल्याचे सांगितले आणि ते क्षण तयार करण्यास सांगितलं जातं असंही म्हटलं. मुलाखतीदरम्यान, टेरेन्सला दीपिका पदुकोणबरोबरचा त्याचा फोटो दाखवण्यात आला. फोटो पाहिल्यानंतर त्याने सांगितले की, हा फोटो ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’मधील आहे आणि दीपिका तेव्हा ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या प्रमोशनसाठी आली होती.

पिंकव्हिलाशी झालेल्या एका खास संभाषणात, लुईसने म्हटलं की, “या यांच्या इच्छा नाहीत. बऱ्याच लोकांना वाटतं की, आम्हाला नाचायचं आहे; पण आम्हाला तसा एक क्षण निर्माण करायला सांगितलं जातं. म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता ‘रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात’ तर हो काही गोष्टी स्क्रिप्टेड असतात. पाहुण्यांशी आणि स्पर्धकांबरोबरच्या गप्पागोष्टी स्क्रिप्टेड असतात. पण डान्स स्क्रिप्टेड नसतो. टॅलेंट स्क्रिप्टेड नसतं त्यानंतरच्या आमच्या प्रतिक्रिया स्क्रिप्टेड नसतात. ते सगळं काही खरं असतं.”

नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

यापुढे टेरेन्सला अनेकदा शोमध्ये अभिनेत्रींना स्टेजवर येण्यास मदत करताना दाखवले जाते. याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “ते ही पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे. मी ते कधीच करणार नाही. परीक्षणाच्या ८ वर्षात मी कधीही कोणालाही फोन करून ‘प्लीज मॅडम’ म्हटले नाही”. तसंच यावेळी त्याने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या सर्जनशीलतेबद्दल सांगितले आणि टीआरपीसाठी शोच्या निर्मात्यांकडून असे दृश्ये तयार केले जात असल्याचेही सांगितलं.

नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

पुढे टेरेन्सने असंही म्हटलं की, “मी सुरुवातीला याला विरोध केला, परंतु जेव्हा निर्मात्यांनी त्याला माहिती दिली की, अशा हलक्याफुलक्या, अतिशयोक्तीपूर्ण क्षणांमुळे प्रेक्षक शोकडे आकर्षित होतात. तेव्हा हे वास्तव मला स्वीकारावं लागलं. त्यामुळे हे सांगायला वाईट वाटतं की, या सगळ्याला प्रेक्षकही दोषी आहेत. कारण अशाच मजामस्तीच्या क्षणांमुळे शोला अधिक टीआरपी आला आणि स्क्रिप्टेड गोष्टींचा आनंद प्रेक्षकांनी अधिक घेतला.”