छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या शर्यतीत जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ मालिका बाजी मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’वर नव्याने सुरू झालेली ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका ‘ठरलं तर मग’ला लवकरच टक्कर देईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सध्याच्या आकडेवारीनुसार पहिल्या स्थानी सायली अर्जुनची ‘ठरलं तर मग’, दुसऱ्या स्थानावर अभिजीत खांडकेकरची ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि तिसरं स्थान ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेने पटकावलं आहे.
अभिनेता अभिजीत खांडकेकरने टीआरपीची ही नवीन यादी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या यादीनुसार पहिल्या १०मध्ये स्टार प्रवाहच्या मालिकांना स्थान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. अनुक्रमे ‘ठरलं तर मग’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकानंतर या यादीत चौथं स्थानं मुक्ता-सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’ने, पाचवं स्थान ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेने आणि सहावं स्थान ‘आई कुठे काय करते’ मालिकेला मिळालं आहे.
हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेला वाटते ‘या’ गोष्टीची भीती; म्हणाली, “९९ टक्के ऑडिशन्समध्ये…”
टीआरपीच्या आकडेवारीनुसार सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी अनुक्रमे ‘कुण्या राजाची गं तू राणी’, ‘आता होऊ द्या धिंगाणा २’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘लग्नाची बेडी’ या मालिका विराजमान आहेत. या यादीत पुढे, थेट १५ व्या स्थानी ‘झी मराठी’च्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला स्थान मिळालं आहे. तसेच या शर्यतीत आता राणादाच्या ‘जाऊ बाई गावात’ शोची एन्ट्री झाली आहे.
हेही वाचा : “महामार्ग निर्माण करताना झाडांची कत्तल…”, जितेंद्र जोशीची संतप्त पोस्ट; म्हणाला, “आताच…”
‘झी मराठी’वर काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाने टीआरपीच्या शर्यतीत एन्ट्री घेत २० वं स्थान मिळवलं आहे. सध्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा कार्यक्रम ४ डिसेंबरपासून ‘झी मराठी’वर सुरू झालेला असून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता याचं प्रक्षेपण केलं जातं.