Tharala Tar Mag Fame Actor Amit Bhanushali : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय आहेत. सायली, अर्जुन, पूर्णा आजी, प्रिया, प्रतिमा, रविराज या सगळ्या कलाकारांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत अर्जुनची मुख्य भूमिका अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच अमितने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. त्याला वाढदिवशी त्याच्या कुटुंबीयांनी खास गिफ्ट दिलं आहे.
अर्जुन-सायलीची ऑनस्क्रीन जोडी सर्वांनाच आवडते. मालिका सुरू झाल्यापासून या जोडीचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. पण, तुम्ही अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील सायलीला पाहिलंय का? अभिनेता मूळ गुजराती कुटुंबातील असून त्याची पत्नी श्रद्धा ही मराठी कुटुंबातील आहे. श्रद्धाने अलीकडेच ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
श्रद्धाने पती अमित भानुशालीला त्याच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिलं आहे. नवीन बुलेट घेतल्याची आनंदाची बातमी अमितने त्याच्या चाहत्यांना युट्यूब व्हिडीओ शेअर करत दिली आहे.
अभिनेत्याचा लेक हृदान, त्याची पत्नी श्रद्धा आणि आई या तिघांनी मिळून अमितला हे वाढदिवसाचं खास गिफ्ट दिलं आहे. या व्हिडीओमध्ये अमित भानुशाली आणि त्याच्या लेकाने पिवळ्या रंगाचं जॅकेट घालून ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिनेत्याने नवीन बाईक घेतल्याची आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करताच प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अमितच्या व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी भानुशाली कुटुंबीयांचं भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सध्याच्या ट्रॅकबद्दल सांगायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमात क्षिती जोगने एन्ट्री घेतली. ती दामिनी देशमुख हे पात्र साकारत आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत दामिनी विरुद्ध अर्जुन सुभेदार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. आता मधुभाऊंची केस सोडवण्यात अर्जुनला यश मिळतंय की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ८:१५ वाजता प्रसारित केली जाते.