‘ठरलं तर मग’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका सर्वात लोकप्रिय ठरली आहे. दीड वर्षांच्या या कालावधीत मालिकेचे लाखो चाहते झाले आहेत. सर्वाधिक टीआरपीचा मानदेखील या मालिकेनेच पटकावला आहे. यातील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मग ती सायली-अर्जुनची जोडी असो वा चैतन्य-साक्षीची. प्रेक्षक संध्याकाळी ८:३० वाजता अगदी आवर्जून या मालिकेसाठी टीव्हीसमोर बसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ठरलं तर मग’ मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत चैतन्य साक्षीबरोबर साखरपुडा करणार आहे, याचा सिक्वेन्स सुरू आहे. तर नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये या साखरपुड्याला सुभेदार कुटुंब आणि अर्जुन-सायली हजेरी लावतात आणि हे पाहून चैतन्यला सुखद धक्का बसतो. पण, तेवढ्यातच अर्जुन आणि सायली चैतन्यला एका खोलीत घेऊन जातात आणि साक्षीच्या विरोधातील पुरावे त्याला दाखवतात. यामुळे चैतन्यला खूप मोठा धक्का बसतो. “मी हा साखरपुडा मोडतोय”, असं चैतन्य दोघांना सांगतो; परंतु तेवढ्यात सायली त्याला अडवते आणि म्हणते, “आजवर साक्षीने तिच्या सोयीनुसार तुमचा वापर केला, आता आपण एकत्र येऊन तिला धडा शिकवूया.”

आता चैतन्यने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर असा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यात सायली, अर्जुन, चैतन्य आणि साक्षी त्यांच्या मजेशीर डान्स स्टेप करत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतायत. यात सायली आणि चैतन्यने कानाजवळ एक फूल घातलं आहे. एकमेकांकडे बघत आणि नंतर एनर्जेटिक डान्स मूव्हमेंट करत या कपल्सने हशा पिकवला आहे.

हेही वाचा… थरारक चित्रपट ‘शैतान’ आता येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

“हे चार इडियट्स कॅमेऱ्यामागे खरोखरं कसे आहेत हे दाखवतोय”, असं कॅप्शन चैतन्यने या व्हिडीओला दिलं आहे.

चैतन्यची ही रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, “बाकी सगळं ठीक आहे, पण चैतन्यने डोक्यात फूल का घातलं आहे?”, “साक्षीने फूल बनवलंय म्हणून चैतन्यच्या डोक्यात फूल”, अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली. “मधूभाऊ आणि विलास कोपऱ्यात बसून रडत असतील.”, “वेडे आहात तुम्ही”, अशा प्रकारच्या कमेंट्स अनेकांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा… “आता मी काय करू?”, ‘ठरलं तर मग’फेम अभिनेता पडला गोंधळात; प्रेक्षकांना प्रश्न विचारत म्हणाला…

दरम्यान, चैतन्य-साक्षी, अर्जुन-सायली यांचं ऑफ स्क्रिन बॉन्डिंग बघून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला; तर आता मालिकेत चैतन्यला साक्षीचा खरा चेहरा कळला आहे, तर चैतन्य आता काय पाऊल उचलेल याची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे. चैतन्य साक्षीबरोबर साखरपुडा करेल का? पुढे काय होईल? हे येत्या काही भागांमध्ये स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag arjun sayali chaitanya sakshi dance performance at engagement ceremony viral video dvr