Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो नुकताच समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर मालिकेत सर्वांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री क्षिती जोगची या मालिकेत एन्ट्री झाली. क्षिती यामध्ये दामिनी देशमुख ही भूमिका साकारणार आहे. साक्षीची केस लढण्यासाठी आणि लेकीला निर्दोष ठरवण्यासाठी महिपतने दामिनी नावाचा हुकमी एक्का अर्जुनविरोधात उभा केला आहे.
दामिनी आजवर एकही केस हरलेली नसते. प्रत्येक केसचा सखोल अभ्यास करून, ती तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रत्येक केस जिंकत असते. त्यामुळेच दामिनीच्या येण्याने अर्जुन-सायलीसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, अडचणी वाढल्या तरीही अर्जुन-सायली या कठीण प्रसंगाला मोठ्या धीराने तोंड देणार आहेत.
मालिकेचा बहुप्रतीक्षित प्रोमो सर्वांसमोर आलेला असून, यामध्ये अर्जुन आणि दामिनी एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळत आहे. दोघेही कोर्टाच्या बाहेर एकमेकांशी हातमिळवणी करतात. यावेळी पत्रकार वर्गही उपस्थित असतो. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगतं आणि अर्जुनने दामिनीला सडेतोड उत्तर देऊन तिची बोलती बंद केल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
दामिनी त्याला म्हणते, “शेवटी समोरासमोर आलोच आपण… आत्मविश्वास ढासळतोय का तुझा?” अर्जुन यावर म्हणतो, “माझा आत्मविश्वास पाहण्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर कोर्टात लढावं लागेल.” पुढे दामिनी त्याला सांगते, “मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आले आहे.”
यानंतर दामिनीला जोरदार प्रत्युत्तर देत अर्जुन म्हणतो, “कोर्टात ना तुम्ही जिंकणार, ना मी… कोर्टात फक्त एकच गोष्ट जिंकणार ते म्हणजे सत्य, सत्य आणि सत्य!” अर्जुनचा हा आत्मविश्वास पाहून दामिनी सुद्धा थक्क झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अर्जुन विरुद्ध दामिनी हा कोर्टरुम ड्रामा प्रेक्षकांना १३ एप्रिलला रात्री ८:१५ वाजता पाहायला मिळणार आहे. आता कोर्टात कोणावर वरचढ ठरणार, साक्षी शिखरे सुटणार की नाही? या गोष्टी प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.