‘ठरलं तर मग’ मालिकेला नुकतंच १ वर्ष पूर्ण झालं आहे. सध्या मालिकेत अर्जुन सायलीचे आभार मानणार असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. परंतु, आता येत्या काळात मालिकेचं कथानक पुन्हा एकदा मधुभाऊंच्या केसकडे वळणार आहे. हा विशेष भाग येत्या रविवारी म्हणजेच १० डिसेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रिया म्हणजेच खोट्या तन्वीनंतर आता अर्जुन कोर्टात साक्षी शिखरेची कसून चौकशी करणार आहे. यावेळी पुरावा म्हणून अर्जुनच्या हाती आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या फुटेजमध्ये साक्षी शिखरे आणि तिची गाडी अगदी सहज पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्जुन साक्षीला तू आश्रमात काय करत होतीस याबद्दल प्रश्न विचारतो. त्याचे प्रश्न ऐकून साक्षी कोर्टात नि:शब्द होते असं समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
अर्जुन कोर्टात साक्षी शिखरेला रिसॉर्टच्या गेटमधून ती नेमकी किती वाजता बाहेर पडली? याबद्दल प्रश्न विचारतो. यावर साक्षी “मी बाहेर पडले नव्हते” असं उत्तर अर्जुनला देते. यानंतर अर्जुन भर कोर्टात साक्षी रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी रिसॉर्टच्या बाहेर पडल्याचं सीसीटीव्ही फुटेज दाखवतो आणि तिचा खोटेपणा सर्वांसमोर उघड करतो. अर्जुनने साक्षी शिखरे, तन्वी आणि महिपतचा खोटेपणा उघड केल्यामुळे सायली प्रचंड आनंदी झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा विशेष भाग प्रेक्षकांना रविवारी १० डिसेंबर दुपारी १ आणि रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील या नव्या ट्विस्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. साक्षी शिखरेचा खोटेपणा सिद्ध झाल्यावर मधुभाऊंची सुटका होणार का? अर्जुन मधुभाऊंना निर्दोष ठरवू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना या विशेष भागात मिळतील. याशिवाय साक्षी शिखरेचा पुढचा डाव काय असेल? अर्जुनचा सहकारी असलेल्या चैतन्यला वेडं ठरवून ती पुरावे नष्ट करणार का? हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, याच नवनवीन ट्विस्टमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे.