‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. सध्या या मालिकेत अर्जुन मधुभाऊंची सुटका करण्यासाठी विविध पुरावे शोधत असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. एकीकडे अर्जुन महिपतचा खोटेपणा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे, रविराज किल्लेदारांना एक साक्षीदार सापडतो. त्यामुळे कोर्टाच्या लढाईत काय ट्विस्ट येणार? याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुनशी भांडण आणि कुसुम ताईच्या हाताला दुखापत झाल्यामुळे सायली सुभेदारांचं घर सोडून आश्रमातील मुलांबरोबर राहायला गेल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळालं. अखेर बायकोची मनधरणी करून अर्जुनने पुन्हा एकदा सायलीला सुभेदारांच्या घरी आणलेलं आहे. एकीकडे सायली-अर्जुन आनंदी असताना प्रिया नवा डाव खेळून त्या दोघांमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करते. परंतु, हा सगळा प्रकार कल्पनासमोर येतो. यापुढे सायली-अर्जुनच्या आयुष्यात तू ढवळाढवळ करायची नाहीस. अशी सक्त ताकीद कल्पना प्रियाला देते. तसेच माझे न ऐकल्यास तुझ्या कारस्थानाबाबत रविराज किल्लेदारांना सांगेन असंही ती प्रियाला बजावते.

हेही वाचा : “हिचं शरीर कृत्रिम, कॉस्मेटिक सर्जरी…”, माधवी निमकरने सांगितला अनुभव; म्हणाली, “अशा कमेंट्स…”

मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळणार आहे. रविराज किल्लेदार साक्षी शिखरेला निर्दोष ठरवण्यासाठी कोर्टात साक्षीदाराला बोलावतात. परंतु, दुसरीकडे अर्जुनने महिपतला अडकवण्याची सगळी तयारी केलेली असते. रविराज किल्लेदारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर अर्जुन मधुभाऊंच्या वतीने कोर्टासमोर बाजू मांडतो.

हेही वाचा : १३ वर्षांच्या लव्ह लाइफनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली लग्नाची घोषणा, तिचा बॉयफ्रेंड काय काम करतो? जाणून घ्या

अर्जुनच्या प्रश्नांची उत्तरं देताना महिपतची बोलत बंद झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अर्जुनने सर्वांसमोर खोटं ठरवल्यामुळे महिपत प्रचंड संतापतो, तो कोर्टात ओरडून हे सगळं खोटं असल्याचं सांगतो. परंतु, याचा काहीच फायदा होत नाही. कारण, अर्जुन माझ्याकडे सगळे पुरावे आहेत असं ठामपणे महिपतला सांगत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा विशेष भाग १९ जानेवारी रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आता आगामी भागात महिपत खरंच पकडला जाणार का? अर्जुनने आणलेल्या पुराव्यांबरोबर चैतन्यने छेडछाड, तर केली नसेल ना? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. मधुभाऊंची निर्दोष मुक्तता झाल्यावर सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पुढे काय होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag courtroom twist arjun finds evidence against mahipat watch new promo sva 00