Tharala Tar Mag Fame Actor : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काम करणारी कलाकार मंडळी घराघरांत लोकप्रिय झाली आहेत. गेल्या दोन वर्षांत सायली, अर्जुन, प्रिया, अस्मिता, साक्षी, महिपत अशा कलाकारांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मालिकेत महिपत या खलनायकाची भूमिका अभिनेते मयूर खांडगे साकारत आहेत. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात अभिनयाच्या जोडीने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा शेतकऱ्यांना तसेच भविष्यात सामान्य लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं अभिनेत्याने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. हा उपक्रम नेमका काय आहे जाणून घेऊयात…
अलीकडच्या काळातील कलाकार मंडळी नेहमीच नवनवीन उपक्रमात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतं. पण, मयूर खांडगे यांनी सुरू केलेला उपक्रम हा काहीसा वेगळा आहे. या उपक्रमाद्वारे रासायनिक खते आरोग्यासाठी कशी धोकादायक असतात आणि यामुळे सेंद्रिय खताचा वापर करणं हे किती गरजेचं आहे, याची माहिती अभिनेत्याने सांगितली आहे. नुकतंच नाशिक मध्ये ‘कृषीथॉन फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आलं होतं. इथे येऊन मयूर खांडगे यांनी स्वतः सेंद्रिय खतांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर करत यासंदर्भात माहिती देणारी पोस्ट देखील लिहिली आहे.
हेही वाचा : नांदा सौख्यभरे! अखेर किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर अडकले लग्नबंधनात, मोठ्या थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
मयूर खांडगे यांची पोस्ट
कृषीथॉन फेस्टिवल २०२४
अभिनय; शेती आणि शेतकरी नेहमीच माझ्या आवडीचा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय.
अभिनय करता-करता शेतकऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करावं असं नेहमी वाटायचं. पण, नेमकं काय ते कळत नव्हतं. कारण, जे करायचं होतं ते आज उद्या आणि भविष्यात शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि भविष्यात आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी सुद्धा उपयोगी असेल असं काहीतरी करायचं होतं. त्याचा शोध घेता-घेता माने ग्रो ऍग्रो या कंपनीच्या संपर्कात आलो. या कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी अतिउत्तम अशा प्रतीचे सेंद्रिय खत तयार केलं आहे. रासायनिक खतांच्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना केमिकल वापरायला भाग पाडून शेतकऱ्यांच्या जमिनीचं जे नुकसान केलंय ते अतिशय भयंकर आहे.काही शेतकऱ्यांच्या ते लक्षात आलंय आणि काही शेतकऱ्यांच्या अजूनही ते लक्षात येत नाहीये. कारण, शेतकऱ्याकडे काही गोष्टींना पर्याय नसतो.
आणि याचाच फायदा केमिकल कंपन्यांनी घेतला. अशाच भयंकर केमिकल वापरलेल्या जमिनीत तयार होणारा सगळा भाजीपाला तुम्ही, मी आणि आपलं संपूर्ण कुटुंब खातोय आणि त्यातूनच नको तितक्या आजारांना आपण बळी पडतोय. वेळीच सेंद्रिय खताचा वापर करून तयार केलेला शेतीमाल जर आपल्यापर्यंत आला नाही तर याचे परिणाम भविष्यात खूप वाईट होणार आहेत यात शंका नाही.मी माझ्या परीने प्रयत्न करतोय की, हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत कसं जाईल, खतात होणारा शेतकऱ्याचा जास्तीचा खर्च कसा कमी होईल आणि शेतकरी आणि त्याची जमीन कशी टिकेल. त्यासाठी मी हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी घेऊन माझ्यापरीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती की, तुम्ही सुद्धा या उत्तम विचारासाठी मला पाठबळ द्यावं आणि माझी सोबत करावी. या कार्यात यश मिळेल की अपयश याची मला खरंच कल्पना नाही पण हे व्हावं अशी अतिशय मनापासून इच्छा आहे. माझ्या अभिनयावर तुम्ही इतकं मनापासून प्रेम करत आहात तर माझ्या या कार्यासाठी सुद्धा तुम्ही मला सहकार्य कराल अशी आशा बाळगतो.
बळीराजाचा विजय असो…#शेतकरी#बळीराजा #mane grow agro
दरम्यान, मयूर यांनी शेअर केलेल्या पोस्टवर मीनाक्षी राठोड, प्रसाद जवादे या कलाकारांनी कमेंट्स करत त्यांना या नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, त्यांच्या अन्य चाहत्यांनी स्तुत्य उपक्रम अशा प्रतिक्रिया देत अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.