पावसाळा म्हटलं की, प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते. ट्राफिक, खड्डे यामुळे दैनंदिन जीवनात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होतो. पावसाळ्यात जलद वेगाने गाड्या चालवल्यास अपघातांची शक्यता वाढते. दरवर्षी यासंदर्भात प्रशासनाकडून नागरिकांना गाड्या हळू चालवण्याचं आवाहन केलं जातं. अशीच एक सगळ्या चाहत्यांना मोलाचा सल्ला देणारी पोस्ट अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केली आहे. या पोस्टमार्फत अभिनेत्रीने पावसाळ्यात गाड्या चालवताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
‘ठरलं तर मग’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे सध्या अभिनेत्री जुई गडकरी चांगलीच चर्चेत आहे. मालिका गेली दीड वर्षे टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा अव्वल स्थान आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. जुईने या मालिकेत सायली हे पात्र साकारलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक जीवनातील प्रत्येक अपडेट ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत असते. सध्या जुईने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जुई गडकरीची पोस्ट
अगदी काल परवापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होतं ना… मला वर्षानुवर्षे त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा… पण निदान त्यामुळे ट्राफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा… घरी उशिरा जात असाल पण, सुखरुप पोहोचत होता!
मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची??? माझी वाट बघणारं घरी कोणी नाही… पण तुमची वाट बघणारे आहेत… काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा… पावसाळा येतोय… पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्किड होतात… तर स्वत:ची आणि इतरांची पण काळजी घ्या
तुमचाच (लाडका) रस्ता!
गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं सुन्नं झालंय… त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे… तो गेले ७-८ दिवस कोमात आहे… प्लीज गाड्या हळू चालवा.
जुईने तिच्या सगळ्या चाहत्यांना या पोस्टद्वारे हे आवाहन केलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. “लवकर तुमचा असिस्टंट बरा व्हावा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मस्त संदेश दिला आहे.”, “खूप महत्त्वाची माहिती… असं लेखन गरजेचं आहे… ताई”, “अगदी बरोबर जुई”, “लोकांना इतकी घाई असते की, करोडचे नुकसान होणार आणि वेळेची बचत होणार असा गाड्यांचा वेग असतो” अशा कमेंट्स करत अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकरी आपलं मत मांडत व्यक्त झाले आहेत.