‘ठरलं तर मग’ मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत विविध ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कायम राहणार की, सायली सुभेदारांचं घर सोडून जाणार याकडे सगळ्याच प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला अल्पावधीतच पसंती मिळाली आहे. यामधील कल्पना, पूर्णा आजी, प्रताप, अस्मिता, प्रिया, अर्जुन, सायली अशी सगळीच पात्र घराघरांत लोकप्रिय झाली आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेत नेहमीच सायली-अर्जुन विरुद्ध महिपत-साक्षी असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतं. आश्रमाच्या केसचा गुंता कधीच सुटू नये आणि मधुभाऊंची कधीच निर्दोष मुक्तता होऊ नये अशी महिपत आणि साक्षी शिखरे यांची इच्छा असते. परंतु, अर्जुन आता लवकरच पुरावे गोळा करून मधुभाऊंच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार आहे. ऑनस्क्रीन सायली आणि साक्षी नेहमीच भांडताना दिसतात. परंतु, यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग खूपच वेगळं आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी, तर साक्षीची भूमिका अभिनेत्री केतकी पालवने साकारली आहे. वैयक्तिक आयुष्यात या दोघींमध्ये छान मैत्री आहे. नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीवर जुईने केतकीचा एकटीचा एक फोटो शेअर करत त्यावर भन्नाट कॅप्शन दिलं आहे.
‘असं’ आहे सायली अन् साक्षीचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग
“ऑनस्क्रीन सायलीला रडवणारी साक्षी ऑफस्क्रीन इमोशनल चित्रपट पाहून अशी रडते” असं कॅप्शन लिहित जुईने केतकी पालवचा चित्रपट पाहतानाचा फोटो शेअर केला आहे. तसंच या स्टोरीमध्ये जुईने तिला टॅग देखील केलेलं आहे. यावरून मालिकेत सतत भांडणाऱ्या सायली आणि साक्षीमध्ये ऑफस्क्रीन छान बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video: एक बार देख लीजिए…; जुईली जोगळेकरने गायलं ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाणं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर गेली दीड वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. यामुळेच ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत सलग १ वर्ष अव्वल स्थानी आहे.