‘स्टार प्रवाह’ वाहिनीने यंदा गणेशोत्सवानिमित्त अनेक स्पर्धांचं आयोजन केलं होतं. या सगळ्या स्पर्धांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यामधील ‘सुवर्ण मुद्रा’ स्पर्धेत कळव्याच्या गृहिणी अश्विनी कुरळे यांनी बाजी मारली. अश्विनी कुरळेंना ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरीच्या हस्ते सुवर्ण मुद्रा प्रदान करण्यात आली.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर पूर्णा आजीला आली होती चक्कर, आईच्या आजारपणाबद्दल काय म्हणाली तेजस्विनी पंडित?
स्पर्धेच्या विजेत्या अश्विनी यांना ‘सुवर्ण मुद्रा’ देण्यासाठी जुई गडकरी खास त्यांच्या कळव्यातील चाळीतल्या घरी पोहोचली होती. अश्विनी कुरळे जुई आणि तिच्या मालिकेच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलामंडळींच्या साथीने मोठ्या आनंदाने जुईचं स्वागत केलं. मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री चाळीत आल्याने सगळ्या महिलांना प्रचंड आनंद झाला होता.
हेही वाचा : Raveena Tandon: रवीना टंडन: अभिनेत्री, फोटोग्राफर आणि दत्तक मुलींची आई
सगळ्या महिलांनी जुईचं औक्षण केलं, शाल-श्रीफळ देऊन अभिनेत्रीचा सत्कार केला. यानंतर जुईने विजेत्या अश्विनी कुरळे यांना सोन्याची मुद्रा प्रदान केली. यावेळी त्या म्हणाल्या, “माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कोणत्यातरी अभिनेत्रीला भेटले. मी त्यांची खूप मोठी चाहती असल्याने त्या माझ्या घरी आल्या ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
हेही वाचा : Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताबरोबर घडणार ‘ही’ वाईट गोष्ट, पाहा व्हिडीओ
स्टार प्रवाह वाहिनीने जुईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून नेटकरी अभिनेत्रीच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. “किती छान सायली ताई”, “जुई खरंच खूप साधी आणि सुंदर अभिनेत्री आहे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.