‘ठरलं तर मग’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत अभिनेत्री मोनिका दबडेने खलनायिकेची भूमिका साकारली आहे. मोनिका मालिका विश्वात गेली अनेक वर्षे काम करत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत तिने ‘अस्मिता’ हे पात्र साकारले आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. परंतु, मध्यंतरीच्या काळात अभिनेत्रीला वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता.
मोनिका दबडेने अलीकडेच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील संघर्षाविषयी भाष्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “२०११ पासून मी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचं हे फार सुरुवातीपासून मी ठरवलं होतं. २०१३ मध्ये मी पुण्याहून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. ‘मी तुझीच रे’, ‘आई मायेचं कवच’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये मी काम केलं आणि त्यानंतर मला ‘ठरलं तर मग’ ही मालिका मिळाली.”
हेही वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटात अलका कुबल यांनी साकारली आहे प्रभावशाली भूमिका, जाणून घ्या…
मोनिका पुढे म्हणाली, “आज अस्मिता या पात्राने घरोघरी लोकप्रियता मिळवली आहे. परंतु, एक काळ असा होता जेव्हा मला काम मिळत नव्हतं, हातात पैसे नव्हते आणि मी पुण्याला पुन्हा निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. मी मूळची पुण्याची आहे. बाहेरच्या व्यक्तीपुढे मुंबईत स्थायिक होणं हे मोठं आव्हान असतं. अनोळखी शहरात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करावी लागते. माझ्यासाठी तो काळ मानसिक आणि आर्थिक संघर्षाचा होता.”
हेही वाचा : ‘बॉलिवूड संपलं’ म्हणणाऱ्यांना मिळालं चोख उत्तर; ऑगस्टमध्ये आलेल्या चार हिंदी चित्रपटांनी कमावले ‘इतके’ कोटी
“कोविडनंतर माझ्याकडे पैसे आणि काम काहीच नव्हतं. अनेक ऑडिशन्समध्ये मला रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे मी मुंबई सोडून पुण्याला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या सगळ्या परिस्थितीला मी शांतपणे सामोरे गेले…संयम ठेवला आणि मला ‘आई मायेचं कवच’ ही मालिका मिळाली. आता मी ‘ठरलं तर मग’मध्ये काम करत आहे. आई-बाबांचे पैसे मी कधीच वापरले नाहीत आणि या कठीण प्रसंगातून स्वत:ला सावरलं याचा मला अभिमान आहे.” असं मोनिका दबडेने सांगितलं.