जवळजवळ दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजेच ‘ठरलं तर मग.’ या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. सर्वाधिक टीआरपीचा मानदेखील या मालिकेनेच पटकावला आहे. गुजराती छोकरा अमित भानुशालीने स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेत अर्जुनची प्रमुख भूमिका साकारून चाहत्यांना भूरळ पाडली. अमितने अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती भाषिक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केलंय.
अमित त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. ‘ठरलं तर मग’च्या सेटवरील धमाल मस्ती असो वा सहकलाकारांबरोबची ऑफ स्क्रीन बॉन्डिंग तो आपल्या चाहत्यांबरोबर सगळं शेअर करत असतो. अमितच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, अमितची पत्नी श्रद्धा आणि लेक हृदानचेदेखील फोटोज आणि व्हिडीओज तो शेअर करत असतो.
हेही वाचा… “आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, गौरव मोरेचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले…
नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आहे. अमितने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर रील शेअर केली आहे. ज्यात अभिनेता म्हणतो, “मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुमचा कोणी जानूमानू आहे की मी मेसेज करू?”
अमितने या रीलसाठी सूट परिधान केला आहे. सफेद रंगाचा शर्ट आणि त्यावर पिस्ता रंगाचं जॅकेट अमितने घातलंय. अमितचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या आहेत. अमितची बायको श्रद्धाचा उल्लेख करून एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “श्रद्धा वहिनी, हा बघा काय बोलतोय.” तर दुसऱ्याने लिहिलं, “घरी गेल्यावर श्रद्धा वहिनी झाडू घेऊन उभी असेल.”
“बिनधास्त करा मेसेज सर” असं एक जण म्हणाला. “मग तुमच्या जानूचं काय?” असा प्रश्न एका युजरने विचारला. तर अमितची ऑन स्क्रीन बायको सायलीचा उल्लेख करत एक जण म्हणाला, “सायलीला दाखवावं लागेल.”
दरम्यान, अमित भानुशालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अमित ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अर्जुन सुभेदार हे पात्र साकारत आहे. तर अभिनेत्री जुई गडकरी सायलीची प्रमुख भूमिका साकारत आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर निर्मित ‘ठरलं तर मग’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत प्रियांका तेंडोलकर, ज्योती चांदेकर, मोनिका, प्रतीक सुरेश, सागर तळाशिकर यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.