‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा यंदा मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण १७ मार्चला स्टार प्रवाह वाहिनीवर करण्यात आलं. यंदाच्या सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अर्जुन-सायलीला एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ मालिकेला यंदाची महामालिका, सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी (अर्जुन-सायली), सर्वोत्कृष्ट परिवार असे महत्त्वाचे तीन पुरस्कार मिळाले. अर्जुनने हा पुरस्कार जिंकल्यावर त्याच्या खऱ्या आयुष्यातील सायलीबरोबर म्हणजेच श्रद्धा भानुशालीबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे. पुरस्कार जिंकल्यावर अभिनेत्याने त्याची पत्नी श्रद्धाबरोबर एक खास फोटो शेअर केला. “तू मला नेहमीच खंबीरपणे पाठिंबा आणि साथ दिलीस. तुझ्या पाठिंब्यामुळे आज मी अभिनेता व्हायचं माझं स्वप्न पूर्ण करू शकलो.” अशी रोमँटिक पोस्ट अमितने श्रद्धासाठी लिहिली आहे. या पोस्टवर सध्या त्याचे चाहते व नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत विशाल निकमसह झळकणार आणखी एक ‘बिग बॉस’ फेम अभिनेता, नाव आलं समोर
दरम्यान, अमित आणि श्रद्धा यांचा लाडका लेक हृदान भानुशालीने देखील काही महिन्यांपूर्वी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती. त्याचे लहानपणीचे फोटो मालिकेत दाखवण्यात आले होते.