‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो मराठी कलाविश्वात सक्रिय आहे. सध्या सुरू असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमधील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ही जोडी प्रेक्षकांची लाडकी असली तरीही अमितच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचं नाव श्रद्धा आहे. तो नेहमीच कुटुंबीयांबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतीच त्याने पत्नीसह लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्याने त्याची भन्नाट लव्हस्टोरी सर्वांना सांगितली. अमित आणि श्रद्धाची लव्हस्टोरी नेमकी केव्हा सुरू झाली जाणून घेऊयात…
‘विवाहबंधन’ आणि इतर काही मालिकांमध्ये काम केल्यावर २०१४ मध्ये अमित आणि श्रद्धाची पहिली भेट झाली होती. या दोघांनी एकमेकांना सर्वात आधी डोंबिवली स्टेशनला पाहिलं होतं. तेव्हा दोघेही लोकल ट्रेनने प्रवास करायचे परंतु, त्यांची एकमेकांशी काहीच ओळख नव्हती. श्रद्धाला अमित ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेत काम करायचा हे माहीत होतं. त्या मालिकेत अभिनेत्याने सिद्धार्थ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यामुळे अमितचं खरं नाव फार कोणालाही माहिती नव्हतं. त्यावेळी त्याच्या पत्नीने खूप शोधाशोध करून त्याचं नाव अमित भानुशाली असल्याचं शोधून काढलं होतं. पुढे, श्रद्धाने त्याला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवून मेसेज केला होता. दोघांमध्ये मेसेजवर खूप गप्पा रंगल्या आणि दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. यानंतर त्यांची पुढची भेट सुद्धा डोंबिवली स्थानकावर झाली होती.
हेही वाचा : “वजन वाढतं, खूप इंजेक्शन्स…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने केले Eggs Freeze, मातृत्वाबद्दल म्हणाली…
अमितची बायको श्रद्धा याबद्दल सांगते, “मेसेजवर बोलणं झाल्यावर आम्ही ३-४ दिवसांनंतर भेटायचं ठरवलं. माझ्यासाठी तो दिवस खरंच खूप अविस्मरणीय होता. कारण, मी पहिल्यांदाच कोणत्या तरी सेलिब्रिटीला भेटणार होते. जेव्हा अमितने हँडशेक करायला हात पुढे केला तेव्हा मी पूर्णपणे थंड पडले होते. आम्ही डोंबिवली स्टेशनला भेटलो आणि पुन्हा एकदा आपआपल्या वाटेने निघून गेलो. पहिल्यांदा डेटवर गेल्यावर मला अमित काय खाईल वगैरे काहीच माहिती नव्हतं. तेव्हा तो एकदम सर्वसामान्य मुलासारखा माझ्याशी वागला. शूटच्या गोष्टी नाही, काही नाही. करिअरबद्दल त्याने सर्व विचारलं. तेव्हाच मला जाणवलं हाच माझ्यासाठी योग्य मुलगा आहे.”
अमित याबद्दल सांगताना म्हणाला, “आम्ही एकमेकांना प्रपोज वगैरे केलं नाही. १५ दिवसांच्या रिलेशनशिपनंतर मी थेट लग्नासाठीच विचारलं होतं. लग्न लगेच नाही झालं. पण, १५ दिवसांतच मी लग्नाची मागणी घातली होती. आमची मैत्री झाल्यावर माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं. तेव्हा ही भेटायला आली होती. त्यानंतर आईला घरी सोडल्यावर श्रद्धा पुन्हा आईला भेटायला आली होती. त्यांच्यामध्ये खूप गप्पा झाल्या. मला दोघींपैकी कोणी विचारलं पण नव्हतं…याच दोघी बोलत होत्या. श्रद्धा पुन्हा घरी जायला निघाल्यावर मी तिला म्हटलं ‘चल बाईकने सोडतो’ त्यावर श्रद्धा म्हणाली नको… अमित सगळेच ओळखतात गैरसमज होतात…मी चालत जाते. ही घरी गेल्यावर आई मला म्हणाली अशीच सून मला हवीये. त्यावर मी म्हणालो करेक्ट हीच येईल!”
“डोंबिवलीमध्ये रिक्षा स्टॅन्डजवळून चालता चालता मला अमित एकदम म्हणाला, अगं श्रद्धा मी विचार करतोय आपण दोघांनी लग्न केलं पाहिजे. मी एकदम थांबले आणि त्याला विचारलं अरे तू खरंच लग्नासाठी विचारतोय? त्यावर तो म्हणाला, अगं उगाच इतर कुठे जाऊन खर्च करण्यापेक्षा इथेच विचारतो. तुझं जे काय उत्तर आहे ते सांग. तेव्हाच त्याने मला थेट विचारलं होतं.” असं श्रद्धाने सांगितलं. अशाप्रकारे यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात होऊन पुढे काही दिवसांत अमित-श्रद्धा विवाहबंधनात अडकले.