‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मालिकेचं रंजक कथानक, कलाकारांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर ‘ठरलं तर मग’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने सायली, तर अभिनेता अमित भानुशालीने अर्जुन हे पात्र साकारलं आहे. आता लवकरच या मालिकेत अमितचा खऱ्या आयुष्यातील मुलगा हृदान भानुशाली पदार्पण करणार आहे. प्रेक्षकांना हृदानची झलक कोणत्या सीनमध्ये पाहायला मिळेल जाणून घ्या…
‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरात सायली-अर्जुन लवकरच आई-बाबा होणार असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. सायलीला अचानक चक्कर येऊ लागल्याने कल्पनाला ती गरोदर असल्याचा संशय येतो त्यामुळे ती अर्जुनला सायलीला डॉक्टरांकडे घेऊन जायला सांगते. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल फक्त चैतन्य व कुसुमला माहीत असतं. मालिकेत बाकी सगळ्या लोकांसमोर सायली-अर्जुन नवरा-बायको असल्याचं नाटक करत असतात.

सायली गरोदर असल्याच्या बातमीवर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केल्याने कल्पना भलतीच आनंदी होते, तर सायली-अर्जुन अस्वस्थ होतात. एवढ्या मोठ्या गैरसमजाच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं हा विचार दोघंही करत असतात. दुसरीकडे कल्पना सर्वांना ही आनंदाची बातमी देते आणि अर्जुनच्या बालपणीचे फोटो शोधू लागते.

हेही वाचा : “मला विचित्र, घाणेरड्या कमेंट्स दिसल्या की…”, अमृता खानविलकर ट्रोलर्सची ‘अशी’ घेते शाळा; म्हणाली, “मी थेट…”
कल्पना अर्जुनच्या बालपणीच्या फोटोंची मोठी फ्रेम बनवून घेऊया असं विमलला सांगते. या फोटोमध्येच प्रेक्षकांना हृदानची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. मालिकेत अर्जुनच्या बालपणीच्या फोटोंमध्ये अमितचा लेक हृदान झळकला आहे. याची खास पोस्ट अमित भानुशालीने देखील सोशल मीडियावर मीडियावर शेअर केली होती. दरम्यान, मालिकेत हृदानची झलक दिसल्याने सध्या अमित भानुशालींच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.