मराठी मालिकाविश्वातील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून प्रसिद्ध झोतात आलेली जुई गडकरी आता ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत तिनं साकारलेली सायली आज घराघरात पोहोचली आहे. कल्याणीप्रमाणे जुईच्या या पात्रावर प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम करत आहे. अशा लोकप्रिय जुई गडकरीनं ‘स्टार प्रवाह’वरील एका मालिकेतील बालकलाकाराच्या कामाचं कौतुक केलं आहे. यासाठी तिनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.
अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ‘ठरलं तर मग’ मालिकेविषयी तसंच पडद्यामागच्या गमतीजमती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिचे मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. याशिवाय तिचे सुंदर फोटो देखील नेहमीच चर्चेत असतात. नुकतीच तिनं एका बालकलाकाराचं कौतुक करणारी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
हेही वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरच्या बॉयफ्रेंडची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, तब्बल ६ वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन
जुईनं ज्या बालकलाकाराचं कौतुक केलं ती दुसरी तिसरी कोणी नसून ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील स्वरा म्हणजे अवनी तायवाडे आहे. ‘तुझेच मी गीता गात आहे’मध्ये अवनीने उत्कृष्टरित्या स्वरा कामतची भूमिका साकारली आहे. त्यामुळेच मालिकेतील तिच्या सीनचा फोटो शेअर करत जुईनं तिची पाठ थोपटली आहे. जुई म्हणाली, “किती समजून काम करतेस अवनी. देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठिशी असो.” जुईचं हे कौतुक पाहून अवनीने सोशल मीडियाद्वारेच तिचे आभार मानले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, हर्दिक जोशी, शैलेश दातार, तेजस्विनी लोणारी, उमेश बने, पल्लवी वैद्य, उषा नाईक अशी तगडी कलाकार मंडळी असलेल्या मालिकेची जागा नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ घेणार आहे. १७ जूनपासून शिवानी सुर्वे व समीर परांजपेची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका सुरू होणार आहे. पण दुसऱ्या बाजूला ‘तुझेच मी गीत गात आहे’चे प्रेक्षक नाराज झाले आहेत. कारण टीआरपीत अव्वल असूनही मालिका बंद करण्याचा निर्णय प्रेक्षकांना पटला नाहीये.