‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढ आहे. काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर असते. आता मालिकेतील कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच सायलीच्या जन्माचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. सध्या मालिकेत सायलीची पहिली मंगळगौर पाहायला मिळत आहे. येत्या भागांमध्ये आता सायली-अर्जुन दहीहंडी साजरी करताना दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “एका म्हातारीने माझी गचांडी पकडली अन्…” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आला होता भयानक अनुभव

प्रत्येक मालिकांमध्ये प्रत्येक सण-उत्सव साजरे करताना दाखवले जाते. अवघ्या काही दिवसांवर दहीहंडी सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे नुकतंच ‘ठरलं तर मग’ मालिकेतही दहीहंडी सण साजरा करतानाच शूट पार पडलं. यावेळी सायली म्हणजेच जुई गडकरीने पहिल्याच टेकमध्ये दहीहंडी फोडल्याच समोर आलं आहे. यामागचं नेमकं कारण काय होतं? याचा किस्सा तिनं स्वतः सांगितला आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानला दिलंय ‘हे’ भन्नाट नाव; जाणून घ्या

‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट मीडियाबरोबर जुईने बोलताना पहिल्याच टेकमध्ये दहीहंडी फोडण्यामागचा किस्सा सांगितला. जुई म्हणाली की, “मला दहीहंडी बघायची खूप आवड आहे. माझे आजोबा-काका कर्जतच्या सगळ्या दहीहंडीला बघायला घेऊन जायचे. पण मी हे पहिल्यांदाच केलं. जेव्हा सगळे गोंविदा चढत असतात तेव्हा मला ते बघूनच भीती वाटते. मात्र आज दहीहंडीचा सीन करताना मी सगळं काही देवावर सोडलं होतं आणि आज आपल्याकडे जे गोविंदा पथक आलंय ते खूप भारी आहे. त्या मुलांनी मला खूप पाठिंबा दिला.”

हेही वाचा – ‘रमा राघव’ या मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

पुढे जुई म्हणाली की, “मी सकाळी आल्यावरच म्हटलं, मला एक फक्त सराव हवाय. मग त्यावेळी मी त्याच्यातली टेक्निक शिकले. मला साधारण कसं चढता येईल, हे जाणून घेतलं. कारण माझा वन शॉट असणार होता. मी घरातून निघून, गोविंदा पथकाच्या जवळ जाते. तितक्यात आमचा कॅमेरामन क्रेनवर चढतो. इतका मोठा टेक्निकल शॉट असणार होता. त्यामुळे तो जर मी रिटेक करत राहिले असते ना तर मग सगळ्यांनाच त्रास झाला असता. त्यात उन्ह होतं. एवढा मोठा क्राउड मॅनेज करायचा होता. त्यामुळे मी देवावर आणि या गोविंदांवर सोडून दिलं होतं. म्हणून तो पहिल्याच टेकमध्ये शॉट झाला.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame jui gadkari broke dahi handi in first take pps