छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. जुईने २००९ मध्ये तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्रीने लक्षवेधी भूमिका साकारल्या. परंतु, ‘पुढचं पाऊल’ मालिकेत तिने साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना सर्वाधिक भावली. यानंतर तिने ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. जुईने तिकडेही प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.
जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीला एकेकाळी इंडस्ट्रीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत सांगितलं आहे.
जुई गडकरीला इंडस्ट्रीत आलेले अनुभव व कधी कोणाचे टोमणे ऐकावे लागलेत का? यासंदर्भात प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “मला एवढे टोमणे ऐकावे लागलेत की एक संपूर्ण बास्केट भरेल. मला आयुष्यात ९० टक्के वाईट बोलणारे लोक भेटले आहेत. जर लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील, तर तुम्ही नक्कीच त्यांच्या पुढे आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा लोकांचं फार मनाला लावून घ्यायचं नाही. माझं दिसणं, माझं बोलणं, माझ्या रंगावरून, उंचीवरून या सगळ्या गोष्टींवरून मी लोकांचं ऐकून घेतलंय. त्या काळात बॉडी शेमिंग हा मुद्दा अस्तित्वात नव्हता. जर, बॉडी शेमिंग ही टर्म तेव्हा प्रचलित असती, तर मी म्हणेन मला तेव्हा मला उटसूट बॉडी शेम करण्यात आलेलं आहे.”
हेही वाचा : ऐका दाजीबा! अवधूत गुप्तेच्या सुपरहिट गाण्याला २१ वर्षे पूर्ण, गायकाने शेअर केला खास डान्स व्हिडीओ
“मला तोंडावर खूप वाईट बोललं गेलं. पण, मी लक्ष द्यायचं नाही हे मनाशी ठरवलं होतं. आजही मी माझं काम करते आणि घरी जाते. कोण काय बोलतंय, कोण काय विचार करतंय याकडे माझं अजिबात लक्ष नसतं. एकदा पॅकअप झालं की, माझं घर माझी वाट बघत असतं. त्यामुळे मी घरी जायला पळते. एकदा घरी गेले की, मी या सगळ्या गोष्टींचा ( कामाचा) अजिबात विचार करत नाही.” असं जुई गडकरीने सांगितलं.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने खरेदी केलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
दरम्यान, जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली हे पात्र साकारत आहे. ही मालिका गेली वर्षभर टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेमुळे अभिनेत्रीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.