अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. जुईने या मालिकेत ‘सायली’ हे पात्र साकारलं आहे. यापूर्वी अभिनेत्रीने स्टार प्रवाह वाहिनी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत काम केलं होतं. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत जुईने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
हेही वाचा : “ठार वेडे आहात…”, हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून प्रसाद ओकची बायको भारावली, पोस्ट शेअर करत केलं कौतुक
‘पुढचं पाऊल’ ही मालिका २ मे २०११ मध्ये प्रसारित झाली. पुढे जवळपास ७ वर्ष या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. १ जुलै २०१७ ला ‘पुढचं पाऊल’चा शेवटचा भाग प्रसारित झाला. जुईला या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. खरंतर,अभिनेत्रीने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेत ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारत मालिका विश्वात पदार्पण केलं होतं. पुढे ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे…’ या मालिकांमध्ये तिने सहायक भूमिका साकारल्या. परंतु, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्रीचं नशीब बदललं.
‘पुढचं पाऊल’या मालिकेचं पुनःप्रक्षेपण सध्या प्रवाह पिक्चर या नव्या वाहिनीवर करण्यात येत आहे. यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत जुईने मालिकेचं शीर्षक गीत गात एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्री लिहिते, “‘पुढचं पाऊल’ या मालिकेने मला सगळं काही दिलं. पुढचं पाऊल या मालिकेचं आणि स्टार प्रवाह वाहिनीचं नातं कायमं घट्ट राहणार…आधी ‘पुढचं पाऊल’ आणि आता मी ‘स्टार प्रवाह’वर ‘ठरलं तर मग’ करतेय हा अनुभव खूपच सुंदर आहे.”
हेही वाचा : Video : “तू गेल्यावर सगळं घर…”, चिमुकल्या मायराने गणपती बाप्पाला घातलं गोड गाऱ्हाणं, पाहा व्हिडीओ
“‘पुढचं पाऊल’ मालिकेचं शीर्षक गीत मला खूप आवडतं. हे गीत माझ्यासाठी कायम जवळचं असेल. नेहा राजपालने या शीर्षक गीताचं भावुक व्हर्जन गायलं होतं. या गीताची निर्मिती निलेश मोहरीर यांनी केली असून रोहिनी निनावे यांनी हे गीत लिहिलं आहे. मला आशा आहे की, तुम्हाला सुद्धा हे गीत आवडतं असेल.” असं जुईने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय तिने तिच्या गोड आवाजात या शीर्षक गीताच्या चार ओळी म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.