Tharala Tar Mag Fame Actress Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. जुईच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना रस असतो. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ‘आस्क मी सेशन’ घेतलं यावेळी तिने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
जुईला सुरुवातीला तिच्या चाहत्याने, “ताई तुला चित्रपटासाठी विचारणा होते का? आणि होत असेल तर स्वीकारत का नाहीस?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “विचारणा होते! पण, मला हवं तसं काम मिळत नाही. म्हणून चांगल्या कामाची वाट बघत आहे.”
जुईने चाहत्याला सांगितलं वय
अभिनेत्रीला तिच्या आणखी एका चाहत्याने वयाबद्दल प्रश्न विचारला. जुई गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मध्यंतरी आजारपणाच्या काळात तिने स्वत:साठी वेळ घेतला होता. पण, यानंतरही आरोग्य जपून तिने पुन्हा एकदा कामावर फिट होऊन परतली आहे. अनेकांना जुईचं वय तिशीच्या आत असल्याचं वाटतं पण, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आता ३६ वर्षांची असून तिला आता ३७ वं वर्ष चालू असल्याचं तिने चाहत्याला दिलेल्या उत्तरात सांगितलं आहे.
आणखी एका चाहत्याने जुईला तिच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारला होता. यावेळी तिने संपूर्ण शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा सांगितली. जुई गडकरीने आपलं पदवीपर्यंतच शिक्षण BMM मध्ये पूर्ण केलं आहे. Advertising विषयात पदवी संपादन करत जुईने मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवलं आहे.
दरम्यान, सध्या जुई ( Jui Gadkari ) ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’मधून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर काही मालिकांमध्ये जुईने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं. मात्र, त्यानंतर २०११ मध्ये आलेली ‘पुढचं पाऊल’ मालिका जुईसाठी गेमचेंजर ठरली. यामध्ये तिने साकारलेल्या ‘कल्याणी’ या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या मालिकेने जवळपास ७ ते ८ वर्ष छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं.