‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी सध्या प्रसिद्धीझोतात आहे. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय नायिका म्हणून तिला ओळखलं जातं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे तिला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. ही मालिका संपल्यावर जुईने ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ‘वर्तुळ’ मालिकेत काम करून जुई आजारपणाच्या कारणास्तव छोट्या पडद्यापासून दूर होती.

जुईने जवळपास ३ वर्षांच्या ब्रेकनंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या माध्यमातून दणक्यात पुनरागमन केलं आहे. गेली दीड वर्षे अभिनेत्रीची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेमुळे यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे बहुतांश पुरस्कार जुईला मिळाले आहेत. परंतु, हा पल्ला गाठण्यासाठी अभिनेत्रीला मोठा संघर्ष करावा लागला आहे. याबद्दल नुकत्याच ‘कॉकटेल स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत जुई व्यक्त झाली आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब अन् चेतना भटचा ‘बाई गं’वर जबरदस्त डान्स! स्वप्नील जोशीने केली खास कमेंट

लहानपणीची बाहुली आणि नुकतीच मिळालेली पुरस्कारांची बाहुली या प्रवासाविषयी सांगताना जुई म्हणाली, “मी या इंडस्ट्रीत गेली १३ वर्षे काम करतेय. पण अशाप्रकारे पुरस्काराची एकही बाहुली माझ्या घरी आलेली नव्हती. मला नॉमिनेशन मिळालं नव्हतं. नॉमिनेशन मिळूनही त्या लिस्टमधून माझं नाव काढून टाकल्याचं मी पाहिलं आहे. पण, याउलट मी सगळ्या कलाकारांचे नॉमिनेशन फॉर्म भरले होते. कारण माझं अक्षर खूप छान होतं. पण, एवढं करूनही मुख्य यादीतून माझंच नाव काढल्याचं मी अनुभवलं आहे.”

जुई पुढे म्हणाली, “या सगळ्यामुळे मला त्या बाहुल्यांची ( पुरस्कार ) किंमत खूप जास्त आहे. गेल्या वर्षभरात मला एकून ६-७ पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे. मी इतकी वर्ष ज्याची वाट पाहिली, ज्या गोष्टींसाठी मी एवढी मेहनत घेतली… त्याची कुठेतरी पोचपावती या पुरस्कारांच्या रुपात मला मिळाली. पण, या सगळ्यात माझ्या कामाची दखल प्रेक्षकांनी घेणं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. मी आजवर घेतलेल्या मेहनतीचं हे सगळं फळ आहे.”

हेही वाचा : “आफ्रिका घाबरायचं बरं का…”, भारताची T20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक, मराठी अभिनेत्याची सूचक पोस्ट

“लहानपणी आपल्या पैशांनी बाहुली विकत कशी घ्यायची ही गोष्ट मला समजली आणि आता या पुरस्काररुपी बाहुल्या मेहनत केल्यावर कशा स्वत:हून आपल्याकडे येतात हे मला समजलं.” असं जुई गडकरीने सांगितलं.

दरम्यान, जुई गडकरी प्रमुख भूमिका साकारत असलेली ‘ठरलं तर मग’ महाराष्ट्राची नंबर १ मालिका म्हणून ओळखली जाते. यामध्ये अभिनेत्रीने सायली हे पात्र साकारलं आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी जुईला यंदा अनेक पुरस्कार मिळाले आहेत.