‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. रंजक कथानक, उत्तम स्टारकास्ट, मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यामध्ये अभिनेत्री जुई गडकरीने सायली, तर अभिनेता अमित भानुशालीने अर्जुन हे पात्र साकारलं आहे. या दोन मुख्य पात्रांबरोबरच या मालिकेची खलनायिका प्रियांका तेंडोलकर सुद्धा चांगलीच चर्चेत असते. आज प्रियांका तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त आज मालिकेतील तिचे सगळे सहकलाकार, कुटुंबीय आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री जुई गडकरीने सुद्धा लाडक्या मैत्रिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. जुईने प्रियांकाबरोबर एक फोटो शेअर करत त्यावर “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रियांका, खूप मोठी हो! आणि अशाच मला मिठ्या मारत राहा” असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा : “तुझं स्थान…”, प्रथमेश परबच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूला पाहिलंत का? वाढदिवशी शेअर केली रोमँटिक पोस्ट
जुईने दिलेल्या कॅप्शनवरुन मालिकेत सतत भांडणाऱ्या सायली-प्रियाचं ऑफस्क्रीन नातं खूपचं सुंदर असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेत प्रिया सतत काहीतरी कारस्थान करून सायलीला त्रास देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण, प्रत्यक्षात या दोघींमध्ये खूप चांगली मैत्री आहे.
हेही वाचा : साखरपुड्याच्या घोषणेनंतर पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा! नावंही आलं समोर
दरम्यान, जुईसह ‘ठरलं तर मग’च्या संपूर्ण टीमने प्रियांकाला वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये सध्या सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं बहरत असल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळत आहे.