जुई गडकरी(Jui Gadkari) व अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. मालिकेचे कथानक, पात्रे, कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. अनेकदा या कलाकारांचे प्रेक्षकांकडून कौतुक होते. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. या मालिकेत जुई गडकरीने सायली ही भूमिका साकारली आहे; तर अभिनेते नारायण जाधव यांनी मधुकर पाटील ही भूमिका साकारली आहे. अनाथाश्रमातील सायलीला मधूभाऊ वडिलांची माया देतात. ती चुकली, तर तिला हक्काने रागावतात, तिच्यावर प्रेम करतात, काळजीने ओरडतात, कधी कधी तिच्या भल्यासाठी कठोर निर्णय घेतात. त्यामुळे मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांची लाडकी ठरताना दिसते. आता जुईने नारायण जाधव यांच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
तुमच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच…
अभिनेत्री जुई गडकरीने नारायण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या गमती-जमती, मजा सुरू असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ शेअर करीत तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. जुईने लिहिले, “मामा, आज तुमचा वाढदिवस. तुमच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे. ‘पुढचं पाऊल’नंतर मला तुमच्याबरोबर पुन्हा काम करायचं होतं आणि ‘ठरलं तर मग’च्या निमित्तानं आपण पुन्हा भेटलो.”
“मामा, आपली मैत्री आता १५ वर्षांची झाली. तुम्ही सेटवर आमच्याकडून होणारा छळ ज्या प्रेमानं सहन करता, त्याला नमस्कार. तुम्हाला कसलाही, कितीही त्रास होत असला तरी तुमच्या चेहर्यावर तो कधीच दिसत नाही आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यात वयाचं एवढं अंतर असूनही तुम्ही सेटवर आमच्यातलेच एक होऊन जाता. तुम्ही अक्कलकोटला गेले असताना देऊळ बंद झालं होतं; पण केवळ मी सांगितलं होतं म्हणून देऊळ उघडेपर्यंत थांबून मी सांगितलेली गोष्ट माझ्यासाठी तुम्ही केलीत. माझ्यासाठी प्रार्थना करणं, सेटवर सतत माझी काळजी घेणं, शूट नसेल तर मेसेज करून माझी चौकशी करणं या सगळ्याने माझ्या मनात तुमच्याबद्दल असलेला आदर अजून वाढलाय.”
पुढे अभिनेत्रीने लिहिले, “मी मधूभाऊंची लाडकी साऊ तर आहेच; पण त्याहीपेक्षा जास्त नारायणमामांची लाडकी जुई आहे हे मला माहीत आहे. आपली ही मैत्री अशीच राहो, अगदी मी तुमच्या वयाची होईपर्यंत. कारण- एक वेळ मी म्हातारी होईन; पण तुम्ही नेहमी आमचे ‘Bosco’च राहणार. लवकरच सेटवर भेटू. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
पुढे चाहत्यांना उद्देशून तिने लिहिले की आज मी एक रील शेअर करत आहे. ती नक्की बघा. स्क्रीनवर अगदी धीरगंभीर असलेले मामा, ॲाफस्क्रीन सॅाल्लीड मजेशीर व सहनशीलही आहेत. दरम्यान, मालिकेत कठोर वाटणारे मधूभाऊ जुईने शेअर केलेल्या रीलमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहेत.