‘पुढचं पाऊल’मधली ‘कल्याणी’ असो किंवा ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’ अभिनेत्री जुई गडकरीने कायमच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवते. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना काही वर्षांपूर्वी वैयक्तिक आजारपणामुळे अभिनेत्रीला कलाविश्वातून काही काळ ब्रेक घ्यावा लागला होता. परंतु, या कठीण प्रसंगाचा सामना करत जुईने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. सध्या तिची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुई गडकरीने नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील कठीण काळ व आजारपण याबाबत भाष्य केलं आहे. अभिनेत्री म्हणते, “मध्यंतरी माझ्या आयुष्यात अनेक विचित्र गोष्टी चालू होत्या. वयाच्या २७ व्या वर्षी मला माझ्या डॉक्टरांनी तू आई होऊ शकणार नाहीस असं सांगितलं होतं. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे मी तेव्हा एकटीच गेले होते. त्यामुळे मला ही गोष्ट समजल्यावर काय करावं हे सुचत नव्हतं. शेवटी, डॉक्टरांनी तुझ्या आईला बोलावून घे…मी त्यांच्याशी बोलते असं सांगितलं. त्यानंतर सगळ्या गोष्टी माझ्या आईला सांगितल्या गेल्या. तेव्हा माझी ‘पुढचं पाऊल’ ही मालिका सुरू होती आणि त्यामध्ये कल्याणीला मूल होणार असतं असा सीक्वेन्स सुरू होता. पण, खऱ्या आयुष्यात परिस्थिती फार वेगळी होती. एकीकडे मला डॉक्टरांनी असं सगळं सांगितलं होतं, तर दुसरीकडे मला ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारायची होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खरंच खूप कठीण होत्या.”

हेही वाचा : Video : २४ वर्षांनी राज मल्होत्रा पुन्हा अवतरला! पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानने रिक्रिएट केला ‘मोहब्बतें’मधील ‘तो’ सीन

जुई पुढे म्हणाली, “मला वेगवेगळे आजार झाले होते. जेव्हा मला समजलं तेव्हा साहजिकच खूप त्रास झाला. त्यात माझी मालिका एकदम उत्तम सुरू होती. त्यामुळे एवढ्या कमी वयात जेव्हा तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही तेव्हा मानसिकरित्या तुम्ही दडपणाखाली येता. या सगळ्याचा माझ्या कामावर परिणाम झाला. माझे अनेक डान्स शो कॅन्सल झाले. पिट्यूटरीमध्ये प्रोलॅक्टिन ट्यूमर, मणक्याचा त्रास, थायरॉईडच्या ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या असे बरेच आजार मला झाले होते. मला पूर्ण आडवं होऊन झोपता यायचं नाही त्यामुळे कित्येक रात्री मी फक्त बसून झोपलेली आहे.”

हेही वाचा : Oscar 2024 : मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाईंना ऑस्करकडून आदरांजली, हॉलीवूडच्या कलाकारांनी केलं स्मरण

“माझ्या ब्रेन सर्जनने दिलेल्या सल्ल्यानुसार मी काही टेस्ट करून घेतल्या त्यावेळी रूमेटॉइड आर्थरायटिसचं निदानं झालं. या आजारात आपलीच रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीरातील चांगल्या टिश्यूंचा घात करते. सात वर्षांनी मला या आजाराबाबत समजलं. यासाठी सूर्यनमस्कार, व्यायाम करणं गरजेचं असतं. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला दोन ते तीन वर्षे गेली. मी दिनचर्या बदलली, संपूर्णपणे शुद्ध शाकाहारी झाले. लॉकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत याची जाणीव मला झाली. पण, या सगळ्यात अध्यात्माची जोड हवी. शेवटी मी सगळं देवावर सोडलं होतं. त्यामुळे माझा देवावर डोळे झाकून विश्वास आहे. आज त्याच्यामुळे सगळं काही व्यवस्थित पार पडतंय” असं जुईने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame jui gadkari talks about her medical phase and health issue sva 00