Tharala Tar Mag Fame Jyoti Chandekar : स्टार प्रवाहची ‘ठरलं तर मग’ मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड्स मोडून आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. ५ डिसेंबर २०२२ रोजी जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका प्रक्षेपित झाली आणि बघता-बघता या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यामधलं प्रत्येक पात्र घराघरांत लोकप्रिय झालं आहे. मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी मध्यंतरी प्रकृतीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा ज्योती चांदेकरांनी नुकताच अमोघ पोंक्षे यांच्या द केक्राफ्ट या युट्यूब वाहिनीशी संवाद साधताना केला.
ज्योती चांदेकर सांगतात, “आमचं मंगळागौरीचं शूटिंग सुरू होतं. मला सरांनी (दिग्दर्शक) खुर्चीवर बसायला सांगितलं. मी तिथे बसले आणि बेशुद्ध पडले. माझ्या शरीरातलं सोडिअम कमी झालं होतं. त्यानंतर या सगळ्या लोकांनी माझ्यासाठी एवढी धावपळ केली. सगळे लोक घाबरले होते, मला लगेच रुग्णालयात दाखल केलं, उपचार सुरू झाले. मला बरं वाटल्यावर मी पुन्हा सेटवर परतले. हा झाला पहिला किस्सा, यानंतर दुसऱ्यावेळी तर मी अगदी वर जाऊनच परत आले असं म्हणायला हरकत नाही.”
“मी दोन महिने आजारी होते. खरंतर कोणत्याही मालिकेची टीम, कोणत्याही कलाकारासाठी २ महिने थांबत नाही. पण, ही सगळी मंडळी माझ्यासाठी २ महिने थांबली. या सगळ्यांनी मालिका एवढी पुढे नेली… आणि या सगळ्यात कोणालाही माझ्या पात्राची कमतरता भासली नाही.” असं ज्योती यांनी सांगितलं.
ज्योती चांदेकरांच्या आजारपणाबाबत लेखिका व अभिनेत्री शिल्पा नवलकर सांगतात, “यासंदर्भात चॅनेल हेड सतिश राजवाडे यांचं मी नक्कीच नाव घेईन. कारण, पूर्णा आजी दोन महिने शूटिंगला नसेल हे स्पष्ट होतं. त्यामुळे चॅनेल मिटींगमध्ये मी हे सांगितलं. जेव्हा चर्चेला सुरुवात झाली, तेव्हा काय करायचं? त्यांना आपण पुढे तुम्ही करणार की नाही विचारुया का की रिप्लेस करायचं? हे बोलताच क्षणी सतिश राजवाडे लगेच म्हणाले होते, नाही अजिबात रिप्लेस नाही करायचं. तब्येतीच्या कारणास्तव रिप्लेस नाही करायचं. हा विषय इथेच थांबवूया. त्या बऱ्या झाल्या की येतील. “
हेही वाचा : नागा चैतन्य-सोभिता धुलिपाला अडकले विवाहबंधनात! नागार्जुन यांनी सूनबाईसाठी लिहिली खास पोस्ट
हा किस्सा सांगितल्यावर शिल्पा नवलकर आणि ज्योती चांदेकर या दोघींनीही चॅनेल हेड सतिश राजवाडे यांचे आभार मानले. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता लवकरच अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटल्याचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.