‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या मधुभाऊंच्या केसचा सीक्वेन्स सुरू आहे. पुराव्यांची शोधाशोध सुरू असताना सायलीला हळुहळू तिचा भूतकाळ आठवू लागला आहे. महिपत आणि नागराज या दोघांनी मिळून काही वर्षांपूर्वी किल्लेदार कुटुंबीयांचा अपघात घडवून आणलेला असतो. या अपघातात फक्त रविराज किल्लेदार सुखरुप वाचतात. त्यांची लाडती लेक तन्वी (मालिकेतील सायली) आश्रमात जाते अन् पत्नी गंभीर इजा झाल्याने ओळख बदलून राहू लागते.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात महिपत प्रतिमाचा खून केल्याचं मान्य करतो. अपघातानंतर पुन्हा घटनास्थळी जाऊन प्रतिमाला जाळून टाकल्याची कबुली महिपत साक्षी, प्रिया आणि नागराजसमोर देतो. परंतु, दुसरीकडे महिपतने केलेल्या एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर देखील प्रतिमा बचावते. सध्या प्रतिमा कविताच्या रुपात ओळख बदलून मालिकेत सर्वत्र वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रतिमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकरांनी या अपघाताच्या सीनचा पडद्यामागचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी अभिनेत्रीला प्रोस्थेटिक मेकअप करण्यात आला आहे. महिपत कसा हल्ला करतो? आणि या सगळ्यातून प्रतिमा कशी वाचते याची झलक शिल्पा नवलकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : “वयाच्या चाळीशीनंतर…”, बॉबी देओलच्या ‘अॅनिमल’मधील भूमिकेबद्दल उपेंद्र लिमये म्हणाले, “तो प्रचंड भावुक…”
दरम्यान, नेटकऱ्यांनी शिल्पा नवलकरांच्या या पडद्यामागच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मालिकेतील हा थराराक सीक्वेन्स पाहून काही युजर्स थक्क झाले आहेत. एका युजरने या व्हिडीओवर “आता लवकरात लवकर प्रतिमाची एन्ट्री दाखवा सगळं आठवलं आहे या हेतूने… म्हणजे पुढचं पाहण्यात मजा येईल.” अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एका युजरने “अखेर तो प्रतिमाचा सीक्वेन्स सुरू होणार” अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे.