‘ठरलं तर मग’ मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली वर्षभर ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. यामधील सायली, अर्जुन, प्रिया, कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता, साक्षी या सगळ्या पात्रांना घराघरांत लोकप्रियता मिळाली आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीचं पात्र ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं आहे.
काही दिवसांपूर्वी मालिकेत पूर्णा आजी देवदर्शनाला बाहेर गेल्याचं दाखवण्यात येत होतं. पण, प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतल्याचं त्यांची मुलगी व चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं होतं. अखेर आजारपणातून ठणठणीत बऱ्या होऊन आता पूर्णा आजी पुन्हा एकदा मालिकेमध्ये परतल्या आहेत.
हेही वाचा : ‘झिम्मा’ फेम दिग्दर्शकाने शेअर केला अमोल कोल्हेंचा लोकसभेतील व्हिडीओ; म्हणाला, “यालाच लोकशाही…”
पूर्णा आजीने मालिकेत पुन्हा एन्ट्री घेतल्यावर तेजस्विनी पंडितने पोस्ट शेअर करत आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. “पूर्णा आजीची दमदार रिएन्ट्री आई तू लढ!!!” असं अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. तेजस्विनीला एक मोठी बहीण सु्द्धा आहे.
हेही वाचा : मुग्धा वैशंपायन नवऱ्यासह पोहोचली कोकणात! दाखवली सासरच्या घराची झलक, पाहा फोटो…
दरम्यान, चाहते देखील गेल्या काही भागांपासून पूर्णा आजीची आतुरतेने वाट पाहत होते. ज्योती चांदेकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. गेली अनेक वर्ष त्या मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.