छोट्या पडद्यावरची आघाडीची नायिका म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. जुईच्या प्रत्येक मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सध्या अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही दर आठवड्यात टीआरपी रेटिंग्ज आल्यावर जुईच्या मनात एक वेगळीच धाकधूक असते. नुकत्याच ‘कॉकटेल स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याविषयी सांगितलं आहे.
जुई म्हणाली, “मी खरंतर अपघाताने या क्षेत्रात आले. माझ्या मैत्रिणीला ऑडिशन द्यायची होती. त्यामुळे मी तिच्याबरोबर एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. माझ्या मैत्रिणीचं सिलेक्शन झालं नाही पण, माझं सिलेक्शन झालं. मी फक्त तो स्टुडिओ बघायला गेले होते. तेव्हापासून देवाच्या कृपेने मला प्रेक्षकांची खूप चांगली साथ मिळाली आहे. सगळ्यांना माझं काम आवडतंय त्यामुळे मी खूप आनंदी आणि समाधानी आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून खूप जास्त छान वाटतं.”
जुई पुढे म्हणाली, “मधल्या तीन वर्षांच्या काळात मी स्वत:साठी ब्रेक घेतला होता. कारण, आपण स्वत:ला वेळ देणं गरजेचं असतं. मी २००९ पासून जे कामाला सुरुवात केली होती ते मी २०१९ पर्यंत काम करत होते. त्यामुळे मला माझ्यासाठी वेळ मिळाला नव्हता. याचा परिणाम अर्थात माझ्या आरोग्यावर झाला. तब्येत बरी नव्हती. या तीन वर्षांच्या ब्रेकनंतर आपण एक लीड अभिनेत्री म्हणून मालिका करणं ही खूप मोठी गोष्ट होती. वाहिनीने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याने माझ्यावर प्रचंड जबाबदारी होती.”
हेही वाचा : ठरलं तर मग : प्रिया चोरणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल, अर्जुन रंगेहाथ पकडणार? पाहा प्रोमो
“माझ्या मनात सुरुवातीला प्रचंड दडपण होतं आणि अर्थात ते दडपण आजही आहे. गेली दीड वर्षे आमचा शो नंबर वनला आहे. आमची मालिका खूप जास्त रेटिंगने पहिल्या क्रमांकावर आहे तरीही मला दडपण येतं. दर बुधवारी मी चिंतेत असते कारण, गुरुवारी टीआरपीचं रेटिंग येणार असतं. दर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता प्रचंड दडपण आलेलं असतं… मी नेहमी सरांना विचारते की, सर रेटिंग काय आहे सांगा. एकंदर मला असं वाटतं हाच माझा स्वभाव आहे. खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणून मी समाधान मानणार नाही. मी सतत मेहनत करत राहणार… या सगळ्यामुळे मला सारखं वाटतं जुई तुला अजून काम करायचंय, वेगवेगळ्या – वैविध्यपूर्ण भूमिका करायच्या आहेत. सुरुवातीपासून ते आतापर्यंत प्रेक्षकांना मिळणारा प्रतिसाद यावर मी आज उभी आहे असं मला वाटतं.” असं जुई गडकरीने सांगितलं.