छोट्या पडद्यावरील आघाडीची नायिका म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. २००९ मध्ये तिने आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेत ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारत जुईने मालिका विश्वात पदार्पण केलं होतं. पुढे ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’ या मालिकांमध्ये तिने सहायक भूमिका साकारल्या. परंतु, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुईचं नशीब रातोरात बदललं. या मालिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी जुई घरोघरी ‘कल्याणी’ या नावाने ओळखली जाऊ लागली. उत्तम करिअर सुरू असताना वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीला मोठ्या आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागला. याविषयी जुईने नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुढचं पाऊल’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर जुई ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाली. या शोनंतर तिने ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’ या मालिकांमध्ये काम केलं. पण, याचदरम्यान अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढाउतार सुरू होते. याबद्दल जुई म्हणाली, “मला एक आजार झाला नव्हता…ते एक प्रकारचं मेन्यू कार्ड होतं. थायरॉईडच्या ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या त्याचं निदान सुरुवातीला झालंच नव्हतं. पिट्यूटरीमध्ये प्रोलॅक्टिन ट्यूमरचा त्रास होत होता. याशिवाय माझ्या मनक्याचं भयंकर वाटोळं झालं होतं. कालांतराने मला रूमेटॉइड आर्थरायटिसचं निदानं झालं. असे बरेच आजार होते आणि मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं.”

हेही वाचा : गुजराती स्टाइल बांधणी साडी, हातात बटवा अन्…; लाडक्या मैत्रिणीच्या लग्नाला पोहोचली सोनम कपूर! पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

जुई पुढे म्हणाली, “माझं सुरुवातीला फक्त डोकं दुखायचं, त्यानंतर वजन वाढलं, मासिक पाळीत अडचणी येऊ लागल्या. यानंतर हळुहळू हे आजार समोर आले. या सगळ्या आजारांवर मी तब्बल ८ ते ९ वर्षे उपचार घेत होते. एवढे औषधोपचार केल्यावर शेवटी मूळ आजाराचं निदान झालं तो आजार होता रूमेटॉइड आर्थरायटिस. या आजारात आपलीच रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीरातील चांगल्या टिश्यूंचा घात करते. काही लोक RA (रूमेटॉइड आर्थरायटिस) हे नाव ऐकूनही घाबरतात. पण, माझं उलटं झालं…चला नेमका आजार काय झालाय याबद्दल तरी मला समजलं अशी भावना माझ्या मनात होती.”

हेही वाचा : “तो माझ्या घरी आला अन्…”, जुही चावलाला आमिर खानने दिलेलं सर्वात स्वस्त गिफ्ट; म्हणाली, “घरातील सर्वजण…”

“रूमेटॉइड आर्थरायटिसची औषधं खूप त्रासदायक असतात. त्यामुळे ती औषधं मी कधीही घेतली नाहीत. याउलट मी माझी संपूर्ण लाइफस्टाइल बदलून टाकली. या सगळ्यात देवाचा वरदहस्त कायम पाठीशी होता. दोन महिन्यांपूर्वी माझे रिपोर्ट्स केले…माझे सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आणि आधीपेक्षा छान आले आहेत. त्यामुळे माझ्या या आजारांपेक्षा आयुष्यात मी जास्त मोठे आहे… ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवते.” असं जुईने सांगितलं.

हेही वाचा : लग्नानंतर चार वर्षांनी लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्री म्हणाली, “प्रेमाचा महिना…”

आजारपणाच्या काळात अनेक शो हातातून निघून गेले याविषयी सांगताना जुई म्हणाली, “या काळात माझ्या हातातून अनेक शो निघून गेले. माझ्या वयाच्या मुली सगळ्या गोष्टी करत आहेत. मग मी का नाही करू शकत? या गोष्टीचा विचार करून मला प्रचंड त्रास व्हायचा. जिमला जाऊ शकत नाही, गाडी चालवू शकत नाही, जमिनीवर बसायचं नाही, डान्स नाही करायचा अशी सगळी बंधनं मला या काळात होती. पण, एक वेळ अशी आली जेव्हा मनात विचार आला डॉक्टरचं ऐकायचं की आयुष्य जगायचं? त्यादिवशी मी ठरवलं आयुष्य जगायचंय!” दरम्यान, या कठीण आजारावर मात करत जुईने ‘ठरलं तर मग’ मालिकेतून दमदार पुनरागमन केलं आहे. सध्या ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag jui gadkari suffering from severe health issues called rheumatoid arthritis reveals in recent interview sva 00