Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदार कुटुंबीयांसमोर उघड झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मालिका सुरू झाल्यापासून सायली-अर्जुन एकमेकांसमोर आपलं प्रेम केव्हा व्यक्त करणार याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, अर्जुन सायलीसमोर आपल्या भावना व्यक्त करणार इतक्यात कल्पनाचा त्याला फोन येतो. यानंतर दोघंही सगळं सोडून घरी जातात. घरी पोहोचल्यावर सगळे संतापलेले आहेत हे पाहून अर्जुन-सायलीच्या पायाखालची जमीन सरकते.
अर्जुनला पाहताच कल्पना दोघांच्या लग्नाबद्दल त्यांना जाब विचारू लागते. प्रियाच्या कारस्थानामुळे अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल सर्वांसमोर येते आणि ऐन वाढदिवसाच्या दिवशी मोठा अनर्थ घडतो. कल्पना चिडून आपल्या लेकाला कानाखाली सुद्धा वाजवते. कोणाचाच यावर विश्वास बसत नसतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर येताच सगळे हादरतात. तर, दुसरीकडे प्रिया मात्र सुभेदारांच्या घरात होणारी भांडणं पाहून प्रचंड आनंदी असते.
हेही वाचा : भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
अर्जुन आईला समजावण्याचा प्रयत्न करतो पण, कोणीही काहीच ऐकून घेण्यास तयार नसतं. शेवटी आता मालिकेत एक अनपेक्षित गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे, कल्पना सायलीला घराबाहेर काढण्याचा मोठा निर्णय घेणार आहे. याचा प्रोमो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
कल्पना सायलीला म्हणते, “तुला घराबाहेर काढण्याची आता वेळ आलीये…चल निघ इथून” सायली लाख विनंती करूनही कल्पना ऐकत नाही. कल्पना तिच्या हाताला धरून सायलीला धक्के मारून अन्नपूर्णा निवासच्या बाहेर ढकलते. हा प्रकार पाहून अर्जुनला अश्रू अनावर होतात. या सगळ्या प्रकरणात चूक एकट्या सायलीची नसून माझी सुद्धा आहे हे तो मान्य करतो आणि घर सोडण्याचा निर्णय घेतो. पण, सायलीला हे मंजूर नसतं.
सायली अर्जुनला प्रेमाने समजावून शपथ देते आणि घरी थांबण्याची विनंती करते. एवढ्यात मधुभाऊ लेकीचा हात धरून तिला घेऊन जातात. सुभेदारांच्या घरून सायलीला बाहेर काढल्यामुळे आता या दोघांच्या नात्याचं पुढे काय भवितव्य असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आता नव्या प्रोमोमध्ये, “अर्जुनची पत्नी आणि मधुभाऊंची मुलगी ही दोन्ही कर्तव्य बजावण्याची मला शक्ती दे” असं म्हणत देवीआईसमोर सायली व्रत करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर आहेत.