‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रियावर जीवघेणा हल्ला होणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुनच्या ऑफिसमधली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल चोरुन प्रिया थेट सुभेदारांच्या घरी जाते. परंतु, वाटेतच अर्जुन-सायली तिला गाठतात आणि फाइल बदलून टाकतात. यामुळे प्रिया सर्वांसमोर तोंडावर पडते. एवढंच नव्हे तर पूर्णा आजी तिला कानशि‍लात लगावते. यानंतर या सगळ्या गोष्टी रविराज किल्लेदारांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे किल्लेदार सुद्धा प्रियावर प्रचंड संतापतात. “तू नक्की माझी आणि प्रतिमाची मुलगी आहेस ना?” असा प्रश्न ते तिला विचारतात.

प्रियाचा प्लॅन पुन्हा एकदा फसल्याचं नागराज जाऊन साक्षी आणि महिपतला सांगतो. यानंतर प्रिया या तिघांना भेटण्यासाठी जाते. तिथे साक्षी सर्वांसमोर प्रियाला झापते. हे सगळं पाहून प्रिया प्रचंड संतापते आणि त्या तिघांना धमकी देऊन तिथून निघून जाते. यानंतर महिपत प्रियावर हल्ला करण्यासाठी सुपारी देतो. नागराजच्या मदतीने हल्लेखोर घरात शिरून प्रियावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, मोठ्या हुशारीने ती यातून सुटते.

हेही वाचा : Video: ‘प्रेमाची गोष्ट’मधील स्वातीचा चिमुकल्या सईबरोबर श्रेया घोषालच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “आत्या आणि भाची…”

एकीकडे महिपत, साक्षी, प्रिया, नागराज यांचे वाद चालू असताना दुसरीकडे सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली आता अर्जुनच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ लागली आहे. तर, अर्जुन देखील “मी मिसेस सायली यांना गूड बॉय बनून दाखवेन” असं ठरवतो. अशातच आता ‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

‘ठरलं तर मग’मध्ये प्रियावर जीवघेणा हल्ला झाल्यावर ती घर सोडून गायब झाली आहे. सकाळी नाश्ता करताना सुमन येऊन रविराज किल्लेदारांना प्रिया घरात नसल्याचं सांगते. यानंतर ते सांगतात “बघ इथेच कुठेतरी असेल” पण, सुमनने सर्वत्र शोधूनही प्रिया कुठेच सापडत नाही. त्यामुळे नेमकी प्रिया कुठे गायब झालीये याचा अंदाज कोणाला नसतो.

हेही वाचा : सुश्मिता सेनचा दुसरा जन्म; वाढदिवसाच्या तारखेत केला बदल, ‘२७ फेब्रुवारी २०२३’ रोजी नेमकं काय घडलं? अभिनेत्री म्हणाली…

आता प्रिया नेमकी कुठे असेल? तिला महिपतच्या गुंडांनी किडनॅप तर केलं नाही ना? असे सगळे प्रश्न मालिकेचा नवीन प्रोमो पाहून उपस्थित होत आहेत. याचबरोबर प्रिया गायब झाल्यावर रविवार किल्लेदार काय भूमिका घेणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरेल.