‘आता रडायचं नाही लढायचं…ठरलं तर मग’ अशा ब्रीदवाक्याखाली मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला अन् स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठरलं तर मग’चे वारे वाहू लागले. हेच वारे वर्षभरात टीआरपीचं वादळ आणतील अशी कल्पनाही कोणी केली नसेल. जुई गडकरी आणि अमित भानुशालीचं पुनरागमन, तगडी स्टारकास्ट, ८.३० चा प्राईम स्लॉट आणि मधुभाऊंच्या केसभोवती फिरणारं मालिकेचं उत्तम कथानक सगळंच हाताशी असल्यावर चर्चा तर होणारचं! मालिका सुरू झाल्यावर घरापासून ते लोकलच्या महिला डब्यापर्यंत सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे ‘ठरलं तर मग’ची!

गेल्यावर्षी ५ डिसेंबरला सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेने गेल्या वर्षभरात सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची, प्रतिमाच्या एन्ट्रीची अनेक वळणं घेतली पण, टीआरपीच्या अव्वल स्थानाला कधीच ब्रेक दिला नाही. आताच्या घडीला ८.३० च्या ठोक्याला सुभेदारांच्या घरात आणि अर्जुन-सायलीच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे? हे पाहिल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. मालिकेत ऑनस्क्रीन घडणाऱ्या गोष्टी आपण नेहमीच पाहतो पण, आज ‘ठरलं तर मग’ला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात…

मालिकेचं कथानक

मालिकेचं कथानक हे प्रेक्षकांना बांधून आणि गुंतवून ठेवणारं हवं असं नेहमी सांगितलं जातं. अगदी याचप्रमाणे ‘ठरलं तर मग’चं दमदार कथानक हीच या मालिकेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. मालिकेत आईपासून दुरावलेल्या सायलीचं संपूर्ण बालपण अनाथ आश्रमात गेलेलं असतं. सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य केवळ तिची आई प्रतिमाला माहिती असतं. अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदारांच्या घरात सध्या कोणालाच ठाऊक नाही. त्यामुळे येणाऱ्या वर्षात या मालिकेत पूर्वीपेक्षा जास्त ट्विस्ट अनुभवायला मिळणार हे नक्की! प्रतिमाचं पात्र हे सलग दररोज न दाखवता आतापर्यंत तिची एन्ट्री योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी दाखवण्यात आल्याने प्रतिमाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात कायम टिकून राहिली आहे. सायलीच्या पायावर असणाऱ्या पानाची खूण अद्याप सुभेदारांच्या घरात कोणीही पाहिलेली नाही. अर्जुनबरोबर केस लढणाऱ्या चैतन्यला साक्षी शिखरेने गुंतवून ठेवणं, अस्मिता-प्रियाचे सगळे कट ताबडतोब उधळून लावणारा अर्जुन या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना भावतात. प्रत्येक भागात काहीतरी वेगळं आणि हटके पाहायला मिळणं म्हणजे सामान्य गृहिणींसाठी पर्वणीच आहे. त्यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीआरपीचं श्रेय दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांसह या मालिकेच्या लेखकांना जातं.

tharala tar mag
ठरलं तर मग

जुई गडकरीचं दणक्यात पुनरागमन

जुई गडकरी म्हणजे छोट्या पडद्यावरचं आघाडीचं नाव. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेत ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारत जुईने मालिका विश्वात पदार्पण केलं. परंतु, स्टार प्रवाहच्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्रीचं आयुष्य रातोरात बदललं. घरोघरी तिला कल्याणी म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर अचानक ओढवलेल्या आजारपणामुळे तिला कलाविश्वातून ब्रेक घ्यावा लागला. मोठ्या ब्रेकनंतर जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे दमदार पुनरागमन केलं आणि घराघरांत लाडकी जुई सायली म्हणून ओळखली जाऊ लागली.

‘ठरलं तर मग’विषयी जुई सांगते, “मालिका सुरू झाल्यापासून आजपर्यंत आम्ही पहिलं स्थान टिकवलं आहे. ही फक्त देवाची कृपा आहे. याशिवाय हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं. मालिकेतील सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. अनाथ असली तरी नात्यांचं महत्त्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र ती प्रचंड वेंधळी आहे. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत तुम्हाला अनेक मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते की इतक्या सुंदर मालिकेचा मला भाग होता आलं.”

jui gadkari
जुई गडकरी

हृषिकेश रानडे-प्रियांका बर्वेच्या आवाजाने सजलेलं शीर्षक गीत

“जवळ राहुनी दूर दूर तू, तुझ्यावाचुनी उदास हे ऋतू
कळेल केव्हा तुला ही व्यथा, माझ्या नजरेने बघ तुलाच तू”

अगदी साध्या सोप्या भाषेत मालिकेच्या कथानकाचं आणि अर्जुन-सायलीच्या कॉन्टॅक्ट मॅरेजचं वर्णन या शीर्षक गीतामध्ये करण्यात आलं आहे. गायक हृषिकेश रानडे व गायिका प्रियांका बर्वे यांच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलेलं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या या साधारण दीड मिनिटांच्या शीर्षक गीताला युट्यूबवर तब्बल १४ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

तमिळ मालिकेचा रिमेक

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटांप्रमाणे मालिकाविश्वातही दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीचा दबदबा पाहायला मिळत आहे. १ वर्ष टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ठरणारी ‘ठरलं तर मग’ ही मालिका ‘रोजा’ या तमिळ मालिकेचा मराठी रिमेक आहे. सन टीव्हीवर रोजा ही मालिका ९ एप्रिल २०१८ मध्ये सुरू झाली. या मालिकेचा शेवटचा भाग ३ डिसेंबर २०२२ मध्ये प्रसारित करण्यात आला होता. ‘ठरलं तर मग’चं कथानक याचं ‘रोजा’ मालिकेवर आधारलेलं आहे. मूळ मालिकेत प्रियांका नालकरी आणि शुभम सूर्यन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एकीकडे ‘रोजा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला, तर दुसरीकडे ‘ठरलं तर मग’ रिमेकच्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली.

आदेश बांदेकरांची निर्मिती

आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंब मराठी मनोरंजनविश्वात सक्रिय आहे. टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवणाऱ्या ठरलं तर मग मालिकेची निर्मिती आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. तसेच या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सचिन गोखले यांनी निभावली आहे.

मालिकेतील तगडी स्टारकास्ट

‘ठरलं तर मग’ मालिकेत जुई गडकरीने ‘सायली’, तर अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारलं आहे. या शिवाय मालिकेत प्रिया तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, सागर तळाशीकर, केतकी पालव, मोनिका दबडे, शिल्पा नवलकर, ज्योती चांदेकर, नारायण जाधव या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्या कलाकारांना गेल्या वर्षभरात प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.

Story img Loader