‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या साक्षीने केलेले सर्व आरोप स्वत:च्या अंगावर घेऊन चैतन्यने अर्जुनला निर्दोष मुक्त केल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुन आणि चैतन्य एकमेकांचे लहानपणापासून मित्र असतात. दोघांमध्ये प्रचंड घट्ट मैत्री असते. परंतु, साक्षीच्या जाळ्यात अडकल्याने मध्यंतरीच्या काळात दोघांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. अखेर साक्षीचा खोटेपणा समोर आल्यावर चैतन्य मित्राच्या बाजूने वळला. ही गोष्ट साक्षी शिखरेपर्यंत गेल्यावर ती पत्रकार परिषद घेऊन दोघांवर फसवणुकीचे गंभीर आरोप करते.
साक्षीच्या आरोपांमुळे अर्जुनच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तो वकील असल्याने चौकशी समिती नेमण्यात येते. या चौकशीतून मुक्त झाल्याशिवाय अर्जुन मधुभाऊंच्या केसप्रकरणात कोणतीही कठोर भूमिका घेऊ शकत नव्हता. यामुळे सुभेदारांची मोठी कोंडी झाली होती. आपल्याला लहानपणापासून खंबीरपणे साथ देणाऱ्या मित्राला या प्रकरणात उगाच गोवलं गेलंय याची पुरेपूर जाणीव चैतन्यला असते. त्यामुळे चैतन्य एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन अर्जुनचा साक्षी शिखरे प्रकरणाशी काहीच संबंध नाही असं जाहीरपणे सांगतो.
मित्राने केलेला एवढा मोठा त्याग पाहून अर्जुनसह सायलीचे डोळे पाणावतात. सगळेच चैतन्यचं कौतुक करत असतात. यावेळी सुभेदारांकडे रविराज किल्लेदार देखील उपस्थित असतात. आता येत्या काळात सायली आपल्या डायरीत मनातल्या भावना लिहित असल्याचं पाहायला मिळणार आहे. यामध्ये ती पूर्णा आजी आमचं नातं स्वीकारतील का? असा विचार करून स्वत:च लाजत अन् हसत असते. तर, दुसरीकडे प्रिया काही करून अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं सर्वांसमोर उघड करायचं ठरवते. यासाठी ती थेट अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचते.
अर्जुनच्या नकळत प्रिया ऑफिसची किल्ली चोरते. यावेळी अर्जुन फोनवर बोलत असतो. तो आणि चैतन्य बाहेर जाणार असतात. यावेळी अर्जुन प्रियाला तू केबिनच्या बाहेर जा… मी ऑफिसमध्ये नसताना माझ्या केबिनमध्ये थांबलेलं मला आवडत नाही असं तो तिला स्पष्टपणे सांगतो. अर्जुनने बाहेर जाताच प्रिया चोरलेल्या चावीच्या आधारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाइलची शोधाशोध करते. एवढ्यात अर्जुन-चैतन्य परत येतात. केबिनमध्ये शोधाशोध करणाऱ्या प्रियाला अर्जुन लांबूनच पाहतो असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आता अर्जुन फाइल चोरणाऱ्या प्रियाला रंगेहाथ पकडणार की प्रिया दरवेळीप्रमाणे खोटं बोलून निसटणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.