‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरात सायली-अर्जुन लवकरच आई-बाबा होणार असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. सायलीला अचानक चक्कर व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने विमल आणि कल्पनाला सायली गरोदर असल्याचा संशय येतो. यामुळे दोघीही तिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगतात. सायली-अर्जुनशिवाय त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य फक्त कुसूम आणि चैतन्यला माहीत असतं. सुभेदारांच्या घरात निर्माण झालेल्या या नव्या गैरसमजामधून अर्जुन कसा मार्ग काढणार हे मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : “ए़वढी वर्ष काम करून इंडस्ट्रीत फक्त एकच मैत्रीण”, अमृता खानविलकरने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली…
कल्पना डॉक्टरांच्या रिपोर्ट्सची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. बैचेन होऊन ती डॉक्टरांना फोन करते आणि माझ्या सुनेच्या रिपोर्ट्सचं काय झालं? याबद्दल चौकशी करते. हा सगळा प्रकार सायली-अर्जुन दूर उभे राहून पाहत असतात. इतक्यात डॉक्टर सायली गरोदर असल्याची माहिती कल्पनाला देतात. डॉक्टरांनी सायलीच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब केल्याने कल्पना प्रचंड आनंदी होते. सायली-अर्जुनला पेढे भरवते. सर्वांना ही आनंदाची बातमी सांगते. पूर्णा आजीदेखील राग विसरून दोघांचं कौतुक करते.
हेही वाचा : अक्षय केळकरने सोडलं कळव्याचं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला “आम्हाला…”
कल्पनाचा उत्साह पाहून हळुहळू सगळ्या सुभेदारांना सायली गरोदर असल्याचं कळतं. दुसरीकडे घरातील परिस्थितीची संपूर्ण माहिती अस्मिता फोन करून प्रियाला देते. सायली गरोदर असल्याचं ऐकून प्रिया अस्वस्थ होते. एकीकडे कल्पना आणि सुभेदार कुटुंबीय आनंद साजरा करत असताना दुसरीकडे सायली-अर्जुन मात्र चिंतेत असतात.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे सायली-अर्जुन फक्त घरच्यांसमोर नवरा बायको असल्याचं खोटं नाटक करत असतात. दोघांचं कॉन्ट्रॅक्ट पुढच्या पाच महिन्यात संपुष्टात येणार असतं. अशा परिस्थितीत या गैरसमजामुळे घरातील परिस्थिती आणखी बिघडू शकते याची जाणीव सायली अर्जुनला करून देते. तसेच लवकरात लवकर यातून मार्ग काढा सांगते. सून गरोदर असल्याने कल्पना खूप प्रेमाने सायलीचे लाड करायला सुरूवात करते. एवढंच नव्हे तर कल्पना अर्जुनचे बालपणीचे फोटो दोघांच्या रुममध्ये लावण्यासाठी शोधून काढते. घरातील बदलेली परिस्थिती पाहून सायली-अर्जुन चिंतेत पडतात. पुढे काय करायचं असा विचार करू लागतात. आता सायली-अर्जुन या गैरसमजाच्या जाळ्यातून स्वत:ला कसं बाहेर काढणार? त्यांचा नातं संपणार की अजून बहरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.