‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अर्जुनच्या वडिलांची निर्दोष सुटका झाल्यानंतर सुभेदार कुटुंबीय यंदा मोठ्या उत्साहात होळी व धुलिवंदनाचा उत्सव साजरा करणार आहेत. परंतु, त्यांच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी मालिकेत एपिसोडमध्ये नेहमीप्रमाणे प्रियाची एन्ट्री होणार आहे. यावेळी सायली प्रियाचा सामना काहिशा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सायलीचं पहिल्यांदाच रौद्ररुप पाहायला मिळत आहे. आता येत्या भागात नेमकं काय घडणार? जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अर्जुनची आई कल्पना अस्मिताला सायलीची माफी माग असं सांगते. याशिवाय तिच्या चुकांचा जाहीर पाढा ती संपूर्ण कुटुंबीयांसमोर वाचून दाखवते. अस्मिताची कारस्थानं ऐकून सगळेच थक्क होतात. एकीकडे लेकीवर नाराज असणारी कल्पना दुसरीकडे, सुनेवर मात्र आनंदी असते. प्रतापसाठी जीवाची बाजी लावून पुरावे शोधल्याने ती सतत सायलीचं कौतुक करत असते. आता येत्या भागात संपूर्ण कुटुंबीय मिळून धुलिवंदन खेळणार आहेत अन् याच भागात एक महत्त्वाचा ट्विस्ट येणार आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू होणार कपूर कुटुंबीयांचा जावई? जान्हवीच्या बॉयफ्रेंडबद्दल वडिलांचं सूचक विधान; म्हणाले…

प्रिया अर्जुनला रंग लावण्यासाठी पुढे येते आणि त्याला जबरदस्ती रंग लावते. पुढे, ती ‘मलाही रंग लाव’ असा हट्ट अर्जुनकडे धरते. हे सगळं दृश्य दूर उभी असलेली सायली बघत असते. अर्जुन काही केल्या प्रियाला रंग लावायला तयार नसतो हे पाहून सायली पुढे येते आणि प्रियाला चांगलंच सुनावते. ‘माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं’ अशी सक्त ताकीद ती भर कार्यक्रमात प्रियाला देते. एवढ्यावरच न थांबता पुढे ती प्रियाला जोरात धक्का मारून अर्जुनला घेऊन जात असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “माझी बहीण कधीच…”, गौतमी देशपांडेची मृण्मयीसाठी मजेशीर पोस्ट, आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

सायलीने पहिल्यांदाच प्रियाला जशास तशी वागणूक दिल्याने सुभेदार कुटुंबीय आनंदी होतात. तर, दुसरीकडे अर्जुनला मनोमन सायलीचं कौतुक वाटतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही सायलीने प्रियाला आपल्यापासून दूर लोटलं याचा त्याला विशेष आनंद होतो. त्याच्या मनात सायलीबद्दल हळुहळू प्रेमाची भावना निर्माण होत असते. त्यामुळे आता अर्जुन सायलीसमोर प्रेमाची कबुली केव्हा देणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

याशिवाय प्रिया भर कार्यक्रमात झालेल्या अपमानाचा बदला कसा घेणार हे आगामी भागात स्पष्ट होईल. दरम्यान, हा धुलिवंदन विशेष भाग सोमवार १ एप्रिल रोजी संध्याकाळी ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag new episode update sayali argue with priya and says stay away from arjun sva 00