‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनच्या वाढदिवसाचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याने त्या दोघांनाही एकमेकांच्या वाढदिवसाबद्दल काहीच कल्पना नसते. अशातच सासूबाई अचानक सायलीला अर्जुनच्या वाढदिवसाबद्दल सांगतात. आता सुभेदार कुटुंबीयांना खोटं प्रेम दाखवण्यासाठी सायली-अर्जुन एकत्र वाढदिवस कसा साजरा करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
एकीकडे सुभेदारांच्या घरात अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी सुरू असताना दुसरीकडे रविराज किल्लेदार प्रतिमा पुन्हा येईल या आशेवर बागेत फुलझाडांची लागवड करत असतात. बायकोच्या आठवणीत मी ही रोपं लावतोय असं ते लेक प्रियाला सांगतात. प्रतिमा जिवंत असल्याचं आणि सायलीचं प्रतिमाची खरी लेक असल्याचं सत्य अद्याप मालिकेत कोणालाच ठाऊक नाही. त्यामुळे प्रतिमा डोक्यावर ओढणी घेऊन सर्वांपासून लपून वावरत असते.
हेही वाचा : “सिद्धेशचे आई-बाबा…”, होणाऱ्या सासूबाईंबद्दल पूजा सावंतचा खुलासा; म्हणाली, “त्यांना माझे सिनेमे…”
आता आगामी भागात प्रतिमा आश्रमातील मुलांना भेटण्यासाठी कुसूमच्या घरी जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वांची भेट घेतल्यावर पुन्हा माघारी निघताना कुसूम तिला अडवते आणि सायलीला भेटून जा असा आग्रह करते. परंतु, प्रतिमाला तिची खरी ओळख कोणालाही दाखवायची नसते. सायलीचं नाव ऐकून ती घरातून पटकन काढता पाय घेते.
सुभेदारांना सांगून सायली आश्रमातील मुलांसह वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचते. रिक्षा चालकाने दिलेले सुटे पैसे तिच्या हातातून निसटतात. सायली खाली वाकून पैसे गोळा करणार इतक्यात प्रतिमा लगेच लेकीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देते. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. सायली-प्रतिमा एकमेकांच्या समोर आल्या हे स्पष्टपणे या प्रोमोमध्ये दिसत आहे. परंतु, या मायलेकींची भेट होईल का? की, भेट होण्यापूर्वीच प्रतिमा नेहमीप्रमाणे तिथून निघून जाणार? हे आपल्याला येत्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : मराठी अभिनेत्याचं बॉलीवूडमध्ये पदार्पण! कार्तिक आर्यनसह शेअर करणार स्क्रीन, फोटो पाहिलेत का?
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणाऱ्या या नवनव्या ट्विस्टमुळे गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. यामध्ये जुई गडकरी, अमित भानुशाली, शिल्पा नवलकर, प्रियांका दिघे, प्रिया तेंडोलकर या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.