‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रियाने सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल चोरल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मधुभाऊंच्या केससाठी सायली आणि अर्जुन यांनी एकमेकांशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं. आश्रम केसचा निकाल लागल्यावर हे दोघंही एकमेकांपासून वेगळे होणार असतात. हे सत्य केवळ चैतन्य आणि कुसूम ताईला माहिती असतं. परंतु, अर्जुनशी वाद झाल्यावर चैतन्य या गोष्टी साक्षी शिखरेला सांगतो. चैतन्यने लाडक्या मित्राचं मोठं गुपित उघड केल्यावर साक्षीला अर्जुनची कोंडी करण्याची नामी संधी मिळते आणि ती हे सगळं प्रियाला सांगते.
प्रियाला अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजल्यावर ती प्रचंड आनंदी होते. काही करून त्यांच्या लग्नाचा पुरावा शोधून काढायचा आणि सुभेदारांसमोर या दोघांचं सत्य उघड करायचं असं प्रिया ठरवते. त्यामुळे यावेळी पूर्ण तयारी करून प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाते आणि तिथून त्याच्या केबिनची किल्ली चोरते. रात्री कोणीही नसताना प्रिया ऑफिसमध्ये जाऊन अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल उचलते. अर्थात याचा अंदाज अर्जुन-सायलीला येतो, त्यामुळे ते सुद्धा या प्रकरणात सतर्क होतात.
प्रिया हे पुरावे येऊन घरी दाखवणार याचा पुरेपूर अंदाज अर्जुन-सायलीला असतो. ठरल्यानुसार प्रिया कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल घेऊन सुभेदारांच्या घरी जाते. याठिकाणी सगळेजण एकत्र असतात. अगदी चैतन्य सुद्धा सुभेदारांकडेच असतो. प्रिया पूर्णा आजीला सांगते, “अर्जुन-सायलीचं लग्न खोटं आहे. त्यांनी १ वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय आणि हा त्याचा पुरावा…बघ पूर्णा आजी कसे तोंडाला कुलूप लावून उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय हे दोघं किती गिल्टी आहेत. तू हे कॉन्ट्रॅक्ट वाचलंस ना आजी… आता या दोघांना चांगलाच जाब विचार”
प्रियाचं म्हणणं ऐकल्यावर पूर्णा आजी अर्जुन-सायलीवर भडकणार असा समज सर्वांनी करून घेतलेला असतो. चैतन्य दोघांची प्रचंड काळजी करत असतो. अर्जुन-सायलीने देखील एकमेकांचे हात घट्ट पकडलेले असतात. पण, घडतं काहीतरी वेगळंच, पूर्णा आजी प्रियाला सर्वांसमोर सणसणीत कानशिलात लगावते. गेल्या काही दिवसांत पूर्णा आजीने अर्जुन-सायलीचं नातं फार जवळून अनुभवलेलं असतं. त्यामुळे तिच्यात हा बदल झाला असल्याचं प्रोमो पाहून लक्षात आहे.
हेही वाचा : आता कल्ला होणारच! ‘बिग बॉस मराठी ५’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, रितेश देशमुखसह झळकला ‘हा’ अभिनेता
आता या सगळ्यातून सायली आणि अर्जुन कसा मार्ग काढणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मालिकेचा हा विशेष भाग १ जुलैला रात्री ८.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड झाल्यावर अर्जुन-सायली पुढे काय भूमिका घेणार? एकमेकांना प्रेमाची कबुली देणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
© IE Online Media Services (P) Ltd