स्टार प्रवाह या वाहिनीवरील सर्वाधिक टीआरपी असणारी मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. साडी नेसणारी सायली अर्जुनला इम्प्रेस करण्यासाठी चक्क शॉर्ट वनपीस घालते. तिला बघून अर्जुनला हसू अनावर होतं आणि तो सायलीला समजावतो, असा सीक्वेन्स सध्या या मालिकेत सुरू आहे.
अर्जुन त्याच्या मनातल्या भावना सायलीला सांगण्यासाठी मुद्दाम लवकर घरी येतो. पण, कॉन्ट्रॅक्टच्या नियमानुसार त्याचं सायलीवर प्रेम आहे हे सांगितलं, तर नातं खराब होईल की काय या भीतीनं अर्जुन मौन बाळगतो. तर, दुसऱ्या बाजूला सायलीनं वनपीस विकत घेतलंय हे अस्मिताला कळतं आणि ती पूर्णाआजीला सांगते. अस्मिता आजीला म्हणते, “ऐकलंस का तू, अर्जुनच्या बायकोनं कपड्यांवर पैसे उडवले आणि तेही कुठले कपडे, वनपीस. आता सुभेदारांच्या सुनेला हे शोभतं का?”
हेही वाचा… मानसी नाईकच्या कथित बॉयफ्रेंडने शेअर केला पॅरिसमधला खास फोटो; म्हणाला, “माझं प्रेम…”
अस्मितानं हे सगळं पूर्णाआजीला सांगितल्यावर आजी सायलीला ओरडेल, असं अस्मिताला वाटणार इतक्यात पूर्णाआजी म्हणते, “अर्जुन नवरा-बायकोमधल्या गोष्टी चार भिंतींतच राहायला हव्यात; बाहेर जाऊ देऊ नयेत. कळलं का गधड्या? मला हे कोणी सांगितलं माहितंय?” यावर अर्जुन “कोणी?” असं विचारताच पूर्णाआजी म्हणते, “तुझ्या आजोबांनी.” पूर्णाआजीच्या या मजेशीर वाक्यावर सगळे हसायला लागतात. नंतर पूर्णाआजी तिच्या काळचे किस्से सांगते. त्यामुळे अस्मिताचा प्लॅन तिथेच फसतो आणि तिची चिडचिड होते.
हेही वाचा… पूजा सावंत आणि पती सिद्धेशने ‘असा’ घालवला वीकेंड; अभिनेत्रीने आकाशपाळण्यातील फोटो केले शेअर
दरम्यान, अर्जुन-सायलीच्या नात्याची गणितं दिवसेंदिवस बदलत जात असल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळालं. आता दोघंही एकमेकांना प्रेमाची कबुली केव्हा देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देणार का? याचा उलगडा पुढील भागांमध्ये होईल.