‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमाचा मृत्यू झालाय असं खोटं भासवण्यासाठी प्रिया आणि नागराजने तिच्या निधनाचे खोटे रिपोर्ट्स तयार केल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रिया रुग्णालयातील नर्सशी संपर्क साधून तिच्याकडून प्रतिमाचे खोटे रिपोर्ट्स तयार करून घेते. बायकोचा मृत्यू झाल्याचं समजताच रविराज किल्लेदारांना मोठा धक्का बसतो. सुभेदार कुटुंबीय सुद्धा रविराजच सांत्वन करण्यासाठी किल्लेदारांच्या घरी पोहोचतात.

प्रतिमाच्या आठवणीत सगळेजण दु:ख व्यक्त करत असतात. रविराज बायकोच्या फोटोला हार घालणार इतक्यात सायली प्रतिमासारखी हुबेहूब साडी नेसून सर्वांसमोर येते. सायलीला पाहून पूर्णा आजीला प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतो आणि प्रतिमाच्या फोटोला कोणीही हार घालू नका असं आजी सर्वांना सांगते. शिवाय सायलीला जवळ घेऊन पूर्णा आजी पहिल्यांदाच तिचं कौतुक करते.

हेही वाचा : “असला घाणेरडा परिसर”, रस्त्यावरचा कचरा पाहून शशांक केतकर संतापला; म्हणाला, “मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा…”

रविराज किल्लेदार घडल्या प्रसंगानंतर काहीच खात नसतात. त्यामुळे सायली स्वत:च्या हाताने त्यांना जेवण भरवते. अगदी थोड्याच वेळात सायली संपूर्ण घराला आपलंसं करून घेते त्यामुळे सगळेच तिचं कौतुक करत असतात. एकीकडे या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे साक्षीला चैतन्यच्या हालचालींवर संशय येतो. याशिवाय जेलमध्ये असलेल्या महिमतने सुद्धा साक्षीला चैतन्यपासून सावध केलेलं असतं. चैतन्य आपल्याशी खरं बोलतोय की खोटं? याची शहानिशा करण्यासाठी साक्षी कल्पनाला फोन करते आणि प्रतिमाच्या निधनाचं तुम्ही चैतन्यला सांगितलं का? अशी विचारपूस करते. कल्पनाला साक्षीचा राग येत असतो आणि त्यात आधीच ती झोपेत असल्याने “नाही…” उत्तर देऊन कल्पना फोन बंद करते आणि साहजिकरित्या चैतन्य खोट्यात पडतो. या प्रसंगामुळे चैतन्य केवळ प्रेमाचं नाटक करतोय यावर साक्षीचा विश्वास बसतो आणि साक्षी अर्जुन आणि चैतन्य दोघांना धडा शिकवायचं ठरवते.

हेही वाचा : लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणातल्या गावी पोहोचली पूजा सावंत, दिसली निसर्गरम्य वातावरणाची झलक

अर्जुनवर मात करण्यासाठी मोठा पुरावा हातात हवा याची पुरेपूर जाणीव साक्षीला असते. त्यामुळे साक्षी यावेळी थेट पत्रकार परिषद बोलावते. ऑन कॅमेऱ्यासमोर ती अर्जुन आणि चैतन्यने मिळून आपली फसवणूक केल्याचं सांगते. “अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनी मिळून माझी खूप मोठी फसवणूक केली आहे. माझ्यासारख्या भोळ्या स्त्रीचा त्यांनी गैरफायदा घेतला. ते दोघं लॉयर्स नसून लायर्स ( खोटारडे ) आहेत आणि मला या प्रकरणात न्याय मिळायलाच पाहिजे.” असं साक्षी सर्वांसमोर सांगते. या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओमध्ये हे सगळं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, साक्षीने केलेल्या आरोपांमुळे सगळे सुभेदार कुटुंबीय चक्रावून जातात. ही केस अजून खोलात जातेय याची जाणीव अर्जुनला होते. त्यामुळे आता आगामी भागात अर्जुन यातून कसा मार्ग काढणार? आणि साक्षी खोटारडी असल्याचं संपूर्ण जगासमोर कसा सिद्ध करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.