Tharala Tar Mag Marathi Serial Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच गणेशोत्सवाचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. जवळपास २० वर्षांनंतर यंदा सुभेदार कुटुंबीय त्यांच्या लाडक्या प्रतिमा आत्याबरोबर यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करणार आहेत. प्रतिमा घरी परतली असली तरीही, तिला भूतकाळातील घटना, किल्लेदार आणि तिचं नातं काय आहे अशा कोणत्याच गोष्टी आठवत नाहीयेत. मात्र, तिची स्मृती परत आल्यावर सर्वाधिक धोका प्रियाला असतो. कारण, प्रिया एवढे दिवस सर्वांसमोर खोटी तन्वी बनून वावरत असते. खरंतर, प्रतिमा – रविराजची खरी मुलगी ही सायलीच असते.
‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत प्रतिमाची स्मृती परत येण्याआधी नागराज आणि महिमत तिला जीवे मारण्याचा प्लॅन बनवतात. परंतु, अर्जुन वेळीच घटनास्थळी पोहोचतो आणि तिचं रक्षण करतो. याशिवाय प्रियाने जिन्यावरून ढकलल्यानंतर सायलीला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असते. आता सायली ठणठणीत बरी होऊन घरी परतली आहे. सुभेदारांच्या घरात सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
प्रियाचा डाव फसणार ( Tharala Tar Mag )
गणपती बाप्पाच्या पूजेला सायलीला येऊ द्यायचं नाही यासाठी प्रिया तिच्या दूधात झोपेच्या गोळ्या मिसळणार आहे. मात्र, पुन्हा एकदा प्रिया तिच्या डावात अयशस्वी ठरणार आहे. नेहमीप्रमाणे प्रियाचा डाव फसणार असून ती स्वत:च झोपून राहणार आहे. घरात बाप्पााच्या पूजेसाठी भटजी येतात आणि पूर्णा आजीला तुमची मुलगी, जावई व नात यांना बोलावून घ्या असं सांगतात. यावर कल्पना प्रिया अजून झोपलीये असा निरोप पूर्णा आजीला देते.
प्रिया झोपली असल्याचं समजताच पूर्णा आजी मोठा निर्णय घेणार आहे. प्रियाऐवजी सायली पूजा करेल कारण, ती सुद्धा प्रतिमा आणि रविराज यांना मुलीसारखीच आहे असं पूर्णा आजी सर्वांना सांगते. रविराज-प्रतिमा आणि त्यांची खरी लेक सायली असे तिघे मिळून सुभेदारांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहेत. हे सगळं पाहून अर्जुनला प्रचंड आनंद होतो. तर, दुसरीकडे झोपेतून उठलेल्या प्रियाला हा सगळा प्रसंग पाहून धक्का बसतो.
हेही वाचा : तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता…; मराठी कलाकारांच्या घरी आले बाप्पा! ढोल-ताशांच्या गजरात केलं गणरायाचं स्वागत
प्रतिमाला खऱ्या लेकीबरोबर आणि नवऱ्यासह पूजा करताना भूतकाळ आठवणार की नाही? तिघांना एकत्र पूजा करताना भूतकाळात घडलेल्या घटनांचा आभास होणार का? या गोष्टी पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.