Tharala Tar Mag New promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायली एकमेकांच्या हळुहळू प्रेमात पडत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. आता लवकरच हे दोघंही एका रेस्टॉरंटमध्ये आपलं प्रेम व्यक्त करणार आहेत. सायलीला प्रपोज करण्यासाठी अर्जुन अंगठी सुद्धा घेऊन जातो. एकीकडे या रोमँटिक क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असताना आता मालिकेच्या नव्या प्रोमोने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सुभेदारांच्या हाती लागणार आहेत. हा भाग अर्जुन-सायलीने प्रेम व्यक्त केल्यावर प्रसारित होईल असा अंदाज प्रोमोमधील दोघांचा लूक पाहून येत आहे. अर्जुन-सायली बाहेरून घरी आल्यावर किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबीय एकत्र दोघांसमोर उभे असतात. सर्वजण या दोघांवर भडकलेले असतात. यापैकी कल्पना पुढे येऊन या अर्जुन-सायलीला त्यांच्या लग्नाबद्दल जाब विचारू लागते.
कल्पना अर्जुनला कानाखाली वाजवणार…
कल्पना म्हणते, “खूप प्रेम आहे ना? तुमचं एकमेकांवर? बोला ना…” यावर अर्जुन-सायली एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, “हो…आहे ना प्रेम.” एवढ्यात कल्पना पुढे येते आणि खाडकन अर्जुनच्या कानाखाली वाजवते. कल्पना पुढे म्हणते, “हे खोटंय… हे सुद्धा तुमच्या लग्नासारखंच खोटं आहे.”
सायली यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते ती म्हणते, “आई अहो…” यावर कल्पना म्हणते, “तू थांब बाहेरच्या माणसांनी यात पडू नये. अर्जुन अरे हिचं सोड… ही माझी कधीच नव्हती पण तू?”
अर्जुन आपल्या आईला म्हणतो, “तू काय बोलत आहेस मला कळत नाहीये.” त्याचे डोळे सुद्धा पाणावलेले असतात. इतक्यात कल्पना कॉन्ट्रॅक्टचे पेपर आणून या दोघांच्या तोंडावर फेकते आणि म्हणते, “हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर!”
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे ( Tharala Tar Mag ) पेपर कुटुंबीयांच्या हाती लागल्याचं पाहताच अर्जुन-सायलीला प्रचंड धक्का बसतो. त्यांना काय बोलावं हे सुद्धा सुचत नसतं. पण, दुसरीकडे प्रिया मात्र हा सगळा ड्रामा पाहून प्रचंड आनंदी होते. त्यामुळे हा सुद्धा तिचाच एक डाव असल्याचं स्पष्ट होत आहे. आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटल्यावर अर्जुन-सायली काय करणार? कल्पना सायलीला घराबाहेर काढणार का? या सगळ्या गोष्टी येत्या काही दिवसात स्पष्ट होतील.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेतील या सगळ्या मोठ्या ट्विस्टची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे आता हा विशेष भाग केव्हा प्रसारित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.