‘ठरलं तर मग’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेने या आठवड्यात सर्व रेकॉर्ड्स मोडत टीआरपीच्या शर्यतीत उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक टीआरपी मिळवल्याने ‘ठरलं तर मग’ ही मालिका महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरली आहे. सध्या मालिकेत सायली-अर्जुन घरच्यांसमोर पुन्हा लग्न करत असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. आता लवकरच मालिकेत एका जोगतीणीची एन्ट्री होणार आहे. सुभेदारांच्या घरात आल्यावर जोगतीण नेमकं काय सांगणार याचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘बिग बॉस १७’ ची दणक्यात सुरुवात, सलमान खानच्या शोमध्ये अंकिता लोखंडे-विकी जैनसह ‘हे’ १७ स्पर्धक सहभागी
अस्मिता आणि प्रिया पूर्णा आजीला सायली विरुद्ध भडकवतात. त्यामुळे आजीच्या इच्छेमुळे अर्जुन पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबीयांसमोर सायलीशी लग्न करतो. सायली आणि अर्जुनचं लग्न केवळ कॉन्ट्रॅक्ट म्हणून झालेलं असल्याने घडला प्रकार पाहून सायली चिडते. ‘तुम्ही असं का वागलात? आणि अन्नपूर्णा आजींच्या भावनांशी का खेळलात?’ असा जाब ती अर्जुनला विचारते. सायली भडकल्यावर अर्जुनला पुन्हा एकदा तो सायलीच्या प्रेमात पडल्याची जाणीव होते.
हेही वाचा : Video: लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री गेली होती भारत-पाकिस्तान सामना प्रत्यक्ष पाहायला, अनुभव शेअर करत म्हणाली…
दुसरीकडे घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुभेदारांच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात येतं. यावेळी सायलीच्या हातून पूजा करूया असा आग्रह कल्पना पूर्णाआजीसमोर धरते आणि सायलीच्या हातून नवरात्रोत्सवाची पहिली पूजा सुभेदारांच्या घरात पार पडते. पूजा झाल्यावर सुभेदारांकडे अचानक एक जोगतीण जोगवा घेऊन येते. यावेळी ती, “अर्जुन म्हणजे शूर आणि सायली म्हणजे फुलासारखी नाजूक असं जरी असलं तरीही, तुम्ही दोघं लग्नाचं खोटं नाटक करत आहात” असं सर्वांसमोर सांगते. जोगतीणीने केलेलं धक्कादायक विधान ऐकून अर्जुन-सायली चांगलेच घाबरतात आणि सुभेदार कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसतो. असं ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इकोफ्रेंडली आलिशान गाडी, किंमत माहितीये का?
जोगतीण आल्यामुळे सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघड होणार का?, दोघांचं भांडं फुटणार का? मालिकेत पुढे काय होणार? हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, मोनिका दबडे, प्रिया तेंडुलकर, प्रियांका दिघे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.