‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत लवकरच दिवाळीचा आणि सायली-अर्जुनच्या पहिल्या दिवाळसणाचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना नवनवे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मालिकेच्या आगामी प्रोमोमध्ये मालिकेत प्रतिमा आणि मधूभाऊंची एन्ट्री होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुभेदारांच्या घराजवळ लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रतिमा येणार असून ती कोणाच्याही नकळत तिचं लक्ष्मीचं नाणं रांगोळीवर ठेवून निघून जाणार आहे. सायली प्रतिमाची खरी मुलगी असल्याने आपल्या आईची चाहूल सर्वप्रथम सायलीला जाणवते. कोणती तरी जवळची व्यक्ती घराजवळ येऊन गेल्याची जाणीव सायलीला होते. एवढ्यात पूर्णा आजीला प्रतिमाचं सोन्याचं नाणं सापडतं आणि ती माझी प्रतिमा इथे येऊन गेली असं सगळ्या सुभेदार कुटुंबीयांना सांगते. लक्ष्मीपूजन पार पडल्यावर अर्जुन दिवाळीच्या पाडव्याला बायकोला खास गिफ्ट देणार असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “गरोदर असताना सातव्या महिन्यांपर्यंत…”, नम्रता संभेरावने सांगितला हास्यजत्रेमधील अनुभव; म्हणाली, “त्या क्षणी प्रचंड रडले…”

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अर्जुन सायलीला खास सरप्राईज देण्यासाठी आश्रमातील मुलांना तिला भेटण्यासाठी घरी आमंत्रण देतो. सायली सगळ्या मुलांना भेटून आनंदी होते एवढ्यात घरी मधूभाऊंची एन्ट्री होते. अर्जुन चैतन्यच्या मदतीने मधूभाऊंची काही काळ सुटका करून घेतो. मधूभाऊंना पाहून सायलीला अश्रू अनावर होतात. यावर अर्जुन मिस सायली हेच तुमचं दिवाळी पाडव्याचं गिफ्ट आहे असं तिला सांगतो. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : पती-पत्नीच्या नात्यावर आधारित नवीन नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला, शिवाजी साटमांची सून दिसणार प्रमुख भूमिकेत

मधूभाऊंशी भेट झाल्याने सायली अर्जुनचे आभार मानते आणि तुमचे हे उपकार मी केव्हाच नाही विसरणार असं त्याला सांगते. सायलीला आनंदी ठेवण्याची अर्जुनची धडपड आता चैतन्यलाही जाणवू लागली आहे. त्यामुळे मधूभाऊंच्या येण्याने सायली-अर्जुनचं नातं कसं वळण घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत मधूभाऊंची एन्ट्री येत्या महासोमवारच्या विशेष भागात म्हणजेच २० नोव्हेंबरच्या भागात होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag serial new twist madhubhau visit sayli arjun home on the occasion of diwali sva 00
Show comments