‘ठरलं तर मग’ ही मालिका सर्वाधिक टीआरपी मिळवत गेल्या महिन्यात महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरली होती. दिग्गज कलाकार, उत्तम कथानक आणि मालिकेत येणारी रंजक वळणं यामुळे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेत सध्या सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं हळुहळू बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, अशातचं अस्मिता अर्जुनला ‘मिसेस सायली’ अशी हाक मारताना ऐकते. त्यामुळे तिला या दोघांच्या नात्यावर संशय येतो.
सायली-अर्जुनचं लग्न झालेलं असून ही दोघं एकमेकांना परक्यासारखे का आवाज देतात? असा संशय अस्मिताला येतो आणि ती प्रियाच्या साथीने एक नवा डाव रचते. दोघांच्या खोलीत कोणीही नसताना अस्मिता गुपचूप मोबाइल ठेऊन जाते. मोबाइलमध्ये सायली-अर्जुनचं संपूर्ण बोलणं रेकॉर्ड होत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
सायली अर्जुनला आता आपलं कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त ५ महिने उरले आहेत अशी आठवण करून देते दोघांचा हा संपूर्ण संवाद मोबाइलमध्ये रेकॉर्ड होतो. जर हा मोबाइल अस्मिताच्या हातात यशस्वीरित्या पुन्हा आला, तर सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं संपुष्टात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अस्मिता दोघांच्या खोलीत मोबाइल लपवल्याची माहिती प्रियाला देते. प्रिया सुद्धा अस्मिताचा प्लॅन ऐकून आनंदी होते.
आता सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं अस्मिता फोडणार? की, त्याअगोदरच अर्जुन अस्मिताचा खोटेपणा उघड करणार हे आगामी भागांमधून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आता लवकरच ‘ठरलं तर मग’मध्ये दसऱ्याचा सीक्वेन्स सुरू होणार असून, यामध्ये घराला तोरण बांधताना अर्जुन सायलीला मदत करणार असल्याचं प्रेक्षकांना उद्याच्या भागात पाहायला मिळेल.