‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनची साक्षीने केलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. चैतन्य पत्रकार परिषद घेऊन “साक्षी शिखरे प्रकरणाशी अर्जुन सुभेदार यांचा काहीच संबंध नसून याला फक्त मी जबाबदार आहे” असं सर्वांसमोर सांगतो. यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिकेत चैतन्यची सनद सहा महिन्यांकरता प्रतिबंध करण्यात आली आहे. तर, अर्जुनची या सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. एकीकडे हा ट्रॅक चालू असताना दुसरीकडे सायली-अर्जुनला धडा शिकवण्यासाठी प्रिया सतत प्रयत्न करत असते.
साक्षी शिखरेने प्रियाला सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्याची माहिती दिली असते. त्यामुळे काहीही करून यासंदर्भातील पुरावे शोधून काढायचे आणि दोघांना धडा शिकवायचा असं प्रिया ठरवते. शोधाशोध करण्यासाठी प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाते. तिथे गेल्यावर ती गुपचूप अर्जुनच्या केबिनची चावी चोरते. याचदरम्यान अर्जुन-चैतन्य केबिनबाहेर जातात आणि अर्जुन सुद्धा प्रियाला इथून जा असं सांगतो. अर्जुनचं सतत लक्ष असल्याने प्रियाला ऑफिसमधून काढता पाय घ्यावा लागतो. अर्थात यामुळेच रात्री जाऊन फाइलची शोधाशोध करायची असा निर्णय प्रिया घेते.
हेही वाचा : “माझा सुपरहिरो गमावला…”, जय दुधाणेच्या वडिलांचं हृदय बंद पडल्याने निधन, शेअर केली भावुक पोस्ट
अर्जुन घरी आल्यावर सायलीला आज प्रिया ऑफिसमध्ये आल्याचं सांगतो. यावरून दोघांनाही सायली ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे गोळा करण्यासाठी आली असावी अंदाज येतो. त्यामुळे सायली-अर्जुन दोघंही घाईने ऑफिसच्या दिशेने जातात. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रिया भर अंधारात अर्जुनच्या केबिनमध्ये फाइल शोधत असल्याचं पाहायला मिळत आहे. थोडीफार शोधाशोध केल्यावर प्रियाच्या हाती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल लागते. निश्चितच ही फाइल पाहून तिला प्रचंड आनंद होतो. दुसरीकडे अर्जुन-सायली ऑफिसमध्ये पोहोचताच फाइल जाग्यावर नसल्याचं पाहून सायली जोरात अर्जुनला आवाज देते. फाइल जागेवर नाही हे पाहून दोघंही चिंतेत पडतात.
सायली-अर्जुनला फाइल चोरी झाल्याचं कळताच मोठं दडपण येतं. कारण, आता आपल्यासमोर एक नवीन संकट उभं राहणार याची जाणीव दोघांनाही असते. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट फक्त यापूर्वी चैतन्य आणि कुसूम ताई यांनाच माहिती असते. अशातच संपूर्ण घरासमोर प्रियाने हे गुपित उघड केल्यास याचा परिणाम मधुभाऊंच्या केसवर देखील होणार याची माहिती सायली-अर्जुनला असते. अशा गंभीर परिस्थितीमध्ये हे दोघं कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा : मनोरंजन विश्वातील कलाकार अन् चित्रपटांबद्दल हटके Quiz! फोटो पाहा अन् १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या
सायली-अर्जुन मधुभाऊंच्या केससाठी फक्त नाममात्र लग्न करतात. परंतु, हळुहळू सायलीचा चांगुलपणा अर्जुनला आकर्षित करतो. अर्जुन तिच्या प्रेमात पडू लागतो. मधुभाऊंच्या केसमध्ये प्रमाणाबाहेर मदत केल्याने आणि अर्जुनचा खरेपणा पाहून आता सायलीच्या मनात देखील अर्जुनविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे. परंतु, या दोघांनीही याविषयी एकमेकांना कबुली दिलेली नाही. त्यामुळे प्रियाच्या फाइल चोरण्याने यांच्या नात्यावर काय परिणाम होणार, ही गोष्ट पूर्णा आजीपर्यंत गेल्यास सायलीला घराबाहेर जावं लागेल का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा आगामी भागात होईल.