‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर तब्बल १२ वर्षांनी अभिनेत्री शिवानी सुर्वेने जोरदार पुनरागमन केलं आहे. ती सध्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत झळकत आहे. दर आठवड्याला टीआरपीच्या शर्यतीत कोणती मालिका बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात कायम असते. नेहमीप्रमाणे या यादीत जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ मालिका यंदाही अव्वलस्थानी आहे. परंतु, हे पहिलं स्थान सोडल्यास त्यानंतरच्या क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे.
अभिनेत्री शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका १७ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. लोकप्रिय अभिनेत्रीचं पुनरागमन असल्याने या मालिकेकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या आणि त्यानुसार टीआरपीच्या यादीचं संपूर्ण चित्र पहिल्याच आठवड्यात पालटलं. शिवानीने जोरदार पुनरागमन करत टीआरपीच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. पहिल्याच आठवड्यात अभिनेत्रीच्या मालिकेने टीआरपीच्या यादीत थेट दुसरं स्थान गाठलं आहे.
हेही वाचा : आमिर खानने मुंबईत घेतली कोट्यवधींची मालमत्ता; स्टॅम्प ड्युटी ५८ लाख, तर अपार्टमेंटची किंमत तब्बल ‘इतके’ कोटी
‘कला’, ‘मुक्ता’, ‘जानकी’ या सगळ्यांना मागे काढत ‘मानसी’ने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता येत्या आठवड्यात शिवानीची मालिका सायलीच्या ‘ठरलं तर मग’ला टक्कर देणार असं चित्र नुकत्याच समोर आलेल्या टीआरपीच्या यादीत पाहायला मिळत आहे. ६.९ रेटिंगसह ‘ठरलं तर मग’ पहिल्या स्थानी आहे. तर, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेला पहिल्याच आठवड्यात ६.८ रेटिंग मिळालं आहे. यानंतर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांचा क्रमांक लागतो.
हेही वाचा : गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम का सोडला? पहिल्यांदाच झाला व्यक्त; म्हणाला, “सलग ५ वर्षे…”
टीआरपीच्या यादीमधील टॉप-१० मालिका
१. ठरलं तर मग
२. थोडं तुझं आणि थोडं माझं
३. लक्ष्मीच्या पाऊलांनी
४. प्रेमाची गोष्ट
५. घरोघरी मातीच्या चुली
६. येड लागलं प्रेमाचं
७. तुझेच मी गीत गात आहे ( महाएपिसोड – अंतिम भाग )
८. साधी माणसं
९. लक्ष्मीच्या पाऊलांनी – महाएपिसोड
१०. अबोली
११. मन धागा धागा जोडते नवा
१२. शुभविवाह
१३. मुरांबा
१४. सुख म्हणजे नक्की काय असतं
१५. शिवा – झी मराठी
टीआरपीच्या शर्यतीत नेहमीप्रमाणे ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचं वर्चस्व कायम आहे. पहिल्या १४ स्थानांवर सगळ्या ‘स्टार प्रवाह’च्या वाहिनीच्या मालिका आहेत. यानंतर थेट १५ व्या स्थानी ‘झी मराठी’ची ‘शिवा’ ही मालिका आहे. तर ‘पारू’ मालिका १६ व्या स्थानावर आहे. आता लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे आता नितीश चव्हाणच्या या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. ही मालिका ८.३० ला म्हणजेच ‘ठरलं तर मग’च्या स्लॉटला प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे टीआरपीचं गणित येत्या आठवड्याच कसं बदलणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.