दर आठवड्यात TRP च्या शर्यतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणे मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील असते.’ स्टार प्रवाह’, ‘झी मराठी’, ‘कलर्स मराठी’ या वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी नेहमीच चढाओढ सुरु असते. गेल्या काही वर्षांपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनी टीआरपीमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाहची ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली दीड वर्षे टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेने सगळे रेकॉर्ड्स मोडत आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तर, या मागोमाग कलाच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेचा दुसऱ्या स्थानी नंबर लागतो. अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी या आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांची वर्णी लागली आहे. यापैकी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने १६ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. याऐवजी वाहिनीवर लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे येणाऱ्या आठवड्याचा टीआरपी पाहून या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली की नाही, शिवानीचं पुनरागमन यशस्वी ठरलं की नाही? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होईल.

हेही वाचा : “धनंजय माने इथेच…”, अशोक सराफ यांच्या दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? ‘अशी ही बनवाबनवी’शी आहे खास कनेक्शन

TRP च्या यादीत नेहमीप्रमाणे ‘स्टार प्रवाह’चं वर्चस्व कायम आहे. टॉप १० मध्ये सगळ्या याच वाहिनीच्या मालिका आहेत. परंतु, या सगळ्यात ‘झी मराठी’च्या नव्याने चालू झालेल्या मालिकांनी झेप घेतली आहे. या आठवड्यात ‘शिवा’ आणि ‘पारू’ या दोन मालिका अनुक्रमे पंधराव्या आणि सोळाव्या स्थानावर आहेत. यापूर्वी या मालिका रेटिंगमध्ये आणखी खाली होत्या. त्यामुळे यांचं रेटिंग आता आधीच्या तुलनेने सुधारलं असल्याचं टीआरपी रिपोर्ट पाहून स्पष्ट होत आहे.

टॉप – १० मालिकांची यादी

१. ठरलं तर मग
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी
३. प्रेमाची गोष्ट
४. तुझेच मी गीत गात आहे
५. घरोघरी मातीच्या चुली
६. येड लागलं प्रेमाचं
७. ठरलं तर मग – रविवार महाएपिसोड
८. अबोली
९. साधी माणसं
१०. मन धागा धागा जोडते नवा

हेही वाचा : Video: आमिर-करीनाच्या गाण्यावर भर रस्त्यात थिरकले सखी गोखले-आशय कुलकर्णी, नेटकरी कौतुक करत म्हणाले…

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा टीआरपी सुद्धा स्लॉटमध्ये बदल केल्यापासून कमी झाला आहे. आता ही मालिका दुपारी प्रसारित केली जाते. याआधी ही मालिका टॉप ५ मध्ये असायची. याशिवाय ‘झी मराठी’च्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा TRP सुद्धा आधीच्या तुलनेत कमी झाला आहे. काही महिन्यांआधी ही मालिका टॉप १५ मध्ये असायची परंतु, आता चित्र बदललं आहे. आता पुढच्या आठवड्यात शिवानी सुर्वेच्या नव्या मालिकेमुळे टीआरपीवर काय परिणाम होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.